चाकण : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेच्या निमित्ताने चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत कर्मचाऱ्यांकडून साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून दररोज रात्री आठ वाजण्याच्या पुढे दुकाने बंद करण्याच्या वेळी कचरा उचलला जात आहे. याच धर्तीवर शहराचा बकाल पणात भर टाकणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून लावण्यात आलेले फ्लेक्स आज नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करून पोलीस बंदोबस्तात काढून टाकले. एसटी बसस्थानक लगत, तळेगाव चौकापासून वाघेवस्ती पर्यंत फ्लेक्स काढण्यात आले.---------------स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या निमित्ताने नुकतीच चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व सीतामाई पाटोळे कनिष्ठ महाविद्यालयातील तीन हजार विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर स्वच्छतेची शपथ घेतली. चाकण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. कचऱ्याच्या गाड्यांना ओला कचरा व सुका कचरा विभाग करण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी व्हिडीओ क्लिप बनविण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात नगरसेवक शेखर घोगरे व स्नेहा जगताप यांच्या प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळेतील मुलांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. आठवडे बाजारात पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे. रोटरी क्लब चे अभियानासाठी सहकार्य लाभत आहे.- अशोक साबळे ( मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद )
स्वच्छता सर्वेक्षणासाठी चाकण नगरपरिषदेची लगबग, दररोज उचलतात कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 9:02 PM