ऑलिम्पिकमध्ये कोरोना, जपानमधील हवामानाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:14+5:302021-07-16T04:09:14+5:30
पुणे : कोरोनामुळे ऑलिम्पिकच्या तयारीला पुरेसा वेळ मिळालेला नाही. मात्र, पूना क्लब आणि सहकाऱ्यांमुळे कमी वेळेत तयारी करता आली. ...
पुणे : कोरोनामुळे ऑलिम्पिकच्या तयारीला पुरेसा वेळ मिळालेला नाही. मात्र, पूना क्लब आणि सहकाऱ्यांमुळे कमी वेळेत तयारी करता आली. प्रत्यक्ष जपानमध्ये कोरोना आणि जपानमधील हवामानाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे पदक मिळवणे अत्यंत आव्हानात्मक असेल, असे टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या उदयन माने याने सांगितले.
उदयन माने आणि अनिर्बन लाहेरी यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. दोघेही ऑलिम्पिमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहेत. दोघेही पूना क्लब गोल्फ कोर्सचे सदस्य आहेत. ऑलिम्पिकमध्ये ६० खेळाडूंचा समावेश असलेल्या गोल्फ स्पर्धेत ३० वर्षीय उदयन आणि भारतातील अव्वल खेळाडू अनिर्बन लाहेरी सहभागी होणार आहेत. उदयनचा पूना क्लब गोल्फ कोर्स येथे पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पूना क्लब गोल्फ कोर्सचे कॅप्टन ललित चिंचनकर, महिला कॅप्टन पद्मजा शिर्के, पूना क्लबचे उपाध्यक्ष सुनील हांडा, कार्यकारिणी समितीचे सदस्य गौरव गढोके, ईक्रम खान आणि माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे उपस्थित होते. अमेरिकेत असल्यामुळे अनिर्बन या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
उदयन म्हणाला की, जपानमध्ये कोरोनाचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑलिम्पिकदरम्यान दररोज आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. त्यामुळे टोकयोमध्ये सरावाला पुरेसा वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे. माझा खेळ व तंदुरुस्ती यात सुधारणा करण्यासाठी पूना क्लबची कार्यकारी समिती आणि सर्व सदस्यांनी मला प्रोत्साहन दिले. येथील सुविधांमुळे मला माझ्या खेळात वेगाने सुधारणा करता आली.
आव्हानासाठी सज्ज
उदयन म्हणाला की, ऑलिम्पिकसाठी पात्र ठल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पीजीटीआय स्पर्धा मालिकेत २०२०, २०२१ या मोसमात चांगली कामगिरी केल्यामुळे मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेन असे वाटत होते. स्पर्धेत कोणतेही आव्हान स्वीकारण्यास सज्ज असल्याचे तो म्हणाला. ऑलिम्पिक मानांकन यादीत अनिर्बन हा ५९ व्या तर उदयन ६० व्या क्रमांकावर आहे.
फोटो - उदयन माने गोल्फ
फोटो आेळी - उदयनचा सत्कार करताना डावीकडून गौरव घोडके, ईक्रम खान, नितीन देसाई, उदयन माने, पद्मजा शिर्के आणि ललित चिंचनकर.