वालचंदनगर : येथील पोलीस चौकीजवळच असलेल्या जुने बसस्थानकावर प्रवाशांची व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्त्री आणि पुरुषांच्या सोयीसाठी सुसज्ज शौचालय उभारण्यात आलेले आहे. या शौचालयात पाण्याची लाईटची आधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले आहे. परंतु वालचंदनगर कंपनीचे या सार्वजनिक शौचालयाकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने महिलांना व पुरुषांना अनेक गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्वरित संबंधित कंपनीने शौचालय नागरिकांसाठी चालू करून देण्यात यावे व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी येथील नागरिकांतून व प्रवाशांतून होत आहे.येथील जुने बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या बसस्थानकावरून सोलापूर, माळशिरस, नातेपुते, जत, अकलूज, शिंगणापूर, दहिवडी, बारामती, इंदापूर, वल्लभनगर, मुंबई अशा मोठमोठ्या शहराच्या मार्गावर बससेवा होत असते. असंख्य प्रवासी व हजारो विद्यार्थी या बसस्थानकावर दररोज ये-जा करीत असतात. गैरसोय लक्षात घेऊन महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. शौचालयाचे उद्घाटन जोरदार करण्यात आले. प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १ वर्ष या शौचालयाची देखभाल करण्यात आली होती.एका व्यक्तीची स्वच्छता राखण्यासाठी नेमणूकही करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन वर्षांपूर्वी अचानक कुलूप लावण्यात आल्याने पुन्हा नागरिकांच्या गैरसोयी वाढलेल्या आहेत. तरी संबंधित कंपनीने हे सुसज्ज सर्व सोयीनींयुक्त बांधण्यात आलेले शौचालय पूर्ववत चालू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. महिलांची होणारी कुचंबना दूर करावे अशी मागणी केली आहे.> वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील जुने बसस्थानकावर नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले शौचालय तीन वर्षांपासून सतत बंद असल्याने गैरसोयी वाढलेल्या आहेत.
शौचालय बंद... उघड्यावर जा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:32 PM