Maharashtra: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:18 PM2021-12-31T17:18:51+5:302021-12-31T17:22:01+5:30
राज्यातील अनेक ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे...
पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेशात थंडीची लाट आली असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रात गुरुवारपासून जाणवण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील अनेक ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. त्याचबरोबर जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका आणखीनच जाणवत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे ११.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागातील तापमानात घट झाली आहे. या भागात पुढील ३ दिवस थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचा परिणाम राज्यात जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली असली तरी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, तर उर्वरित ठिकाणी किमान तापमान हे सरासरी तापमानाच्या जवळपास आहे. असे असले तरी जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२.९, लोहगाव १४.८, जळगाव १२.२, कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १२.२, मालेगाव ११.४, नाशिक १२.५, सांगली १६.३, सातारा १६, सोलापूर १५.७, मुंबई १९.८, सांताक्रूझ १९.५, अलिबाग १७.७, पणजी २१, रत्नागिरी १८.७, डहाणू १६.८, औरंगाबाद १२.६, परभणी १५.५, नांदेड १७.२, अकोला १४.९, अमरावती १३.१, बुलडाणा १२, ब्रह्मपुरी १५.६, चंद्रपूर १४.४, गोंदिया १३.८, नागपूर १४.६, वर्धा १३.२.