विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:15 AM2018-05-30T07:15:56+5:302018-05-30T07:15:56+5:30
महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य खरेदी आवश्यक असलेला
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य खरेदी आवश्यक असलेला निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. २९) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य खरेदीचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचा की डीबीटी योजनेद्वारे ठेकेदारांमर्फत विद्यार्थ्यांना वस्तूचा पुरवठा करायचा, यासाठी गेल्या एक-दीड महिन्यापासून महापालिकेत वाद सुरू होता.
या प्रशासनाने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा प्रस्ताव दिला होता, तर सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी डीबीटी योजनेसाठी आग्रही होते. अखेर मंगळवारी (दि. २९) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गणवेश व शालेय साहित्य खरेदीचा निधी थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सध्या ६० टक्के विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असून, येत्या पंधरा दिवसांत शिल्लक विद्यार्थ्यांची बँक खाती सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ ते १४ जूनदरम्यान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतील, असे स्थायी समिती अध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.
बैठकीत गणवेशाचा रंग बदलण्याचादेखील विषय ठेवण्यात आला होता. परंतु गतवर्षीचाच गणवेश कायम ठेवण्याच्या उपसूचनेसह या विषयाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेवर शालेय साहित्य उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि तांत्रिक विभागाकडील विद्यार्थी शिक्षण घेत असतात.
या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गणवेश, बूट, मोजे, दप्तरे,
वह्या, चित्रकलासाहित्य, लेखन साहित्य, पाट्या, बनियन, पेटीकोट, ट्रॅक सूट-बूट आणि स्वेटर, रेनकोट आदी शालेय साहित्य मोफत पुरविण्यात येते. सध्या महापालिकेच्या प्राथमिक विभागात २८७ शाळांमधून एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात प्राथमिकच्या ५२ हजार विद्यार्थ्यांचे व माध्यमिकच्या १२ हजार विद्यार्थ्यांची बँक खाती उघडलेली आहेत.