पुणे : अवीट मराठी गीतांना संगीताचा साज चढवून अजरामर केलेल्या तीन दिग्गज संगीतकारांच्या संगीतमय आठवणींची मैफल अनुभवण्याची संधी शनिवारी पुणेकरांना मिळाली. त्यांनी संगीतबध्द केलेली गीते आणि त्यांच्या संगीत संयोजनाच्या आठवणी ऐकताना रसिकही भारावून गेले होते. हे तीन दिग्गज होते प्रभाकर जोग, अशोक पत्की व श्रीधर फडके. निमित्त होते प्रसिध्द संगीत संयोजक श्यामराव कांबळे यांच्या सांगितीक जीवनावरील ‘रहे ना रहे हम’ या पुस्तक प्रकाशन सोहळ््याचे. कांबळे यांची कन्या आशा वैद्य यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे अनुबंध प्रकाशनतर्फे प्रकाशन करण्यात आले. गीतकाराने गीत लिहिल्यानंतर संगीतकार त्याला चाल देतो. त्यापुढे संगीत संयोजक विविध विविध वाद्यांचा वापर नेमक्या ठिकाणी खुबीने करीत गाण्याची उंची वाढवितो. कांबळे यांनी आपल्या वेगळ््या धाटणीच्या संगीत संयोजनाने केलेल्या अजरामर गीतांच्या आठवणी सांगत तीनही संगीतकारांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी आशा वैद्य, अॅड. पी. बी. वैद्य, अनुबंधचे अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली’ या गाण्याच्या संगीत संयोजनामागची भुमिका जोग यांनी सांगितली. ते म्हणाले, श्यामराव कांबळे यांनी विविध वाद्यांचा केलेला वापर अतिशय चपखल आहे. संयोजनासाठी ते प्रत्येक गोष्टीचा सांगोपांक विचार करीत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खुप आनंद घेतला. अनेक गाणी त्यांच्यासोबत केली. अशोक पत्की यांनी ‘नाविका रे वारा वाही रे’ या गीताच्या आठवणी सांगितल्या. गाणे व संयोजन एकवटून आणण्याची वेगळी कला कांबळे यांच्या अंगी होती. उपलब्ध वाद्यांमध्ये संयोजन केलेले हे गाणे त्यांच्या कलेची साक्ष देते, असे पत्की म्हणाले. आदर्श संगीत संयोजक म्हणून कांबळे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. मुखडा व अंतरा यांना जोडणारा सेतु मधले संगीत असते. हा सेतु बांधण्याचे काम त्यांनी केले, असे फडके यांनी नमुद केले. तसेच ‘सांज ये गोकुळी’ या गीताच्या संगीत संयोजनाची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. कार्यक्रमात कांबळे यांनी संगीत संयोजन केलेली काही गीते ऐकविण्यात आली. आशा वैद्य यांनी पुस्तकामागची भुमिका स्पष्ट केली.
संगीतमय आठवणींची रंगली मैफल
By admin | Published: January 04, 2015 12:48 AM