रांजणगाव सांडस : येथील रांजणगाव सांडस-वाळकी येथील मुळा-मुठा भीमा नदीच्या संगमबेटाला जलपर्णीने विळखा घातला आहे. चालू वर्षीचा पावसाळ्यात पाणी हे नदीपात्रात आले व वाहून गेले. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी पारगाव येथील बंधाऱ्याला प्लेटा टाकण्यात आल्या. प्लेटा टाकून १५ दिवस झाले. तसेच भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे मुळा-मुठा भीमा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. वाहणाºया पाण्याचा प्रवाह अडविला गेल्यामुळे वाहणारे पाणी पात्रात स्थिर झाले. या पाण्यावर तेलकट तवंग जमा झालेला दिसत आहे.
पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे मैला मिश्रीत पाणी, याच भागातील औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांचे रासायनिक पाणी, हे प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जाते. या पाण्याच्या पृष्ठभागावर रासायनिक तवंग साचले आहे. त्यातच जलपर्णीची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. थोड्याच दिवसात नदीपात्राला जलपर्णीने व्यापले आहे. जलपर्णी वीज पंपाच्या फुटबॉलला अडकल्याने ती काढण्यासाठी शेतकरी नदीपात्रात रात्री अपरात्री उतरतात. पंपाद्वारे नेलेल्या पाण्याचा शेतात फेस तयार होत आहे. पाण्याला दुगंर्धी येत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीच्या काठावरील शिरुर तालुक्यातील राक्षे वाडी, रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, सादल गाव, मांडवगण फराटे, बाभूळसर, तर दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील कान गाव, नान गाव, पारगाव, तर मुळा मुठा नदीच्या काठावरील देलवडी, पिंपळ गाव राहू, या नदीच्या काठावरील गावांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.