पुणे : जलसंपदामंत्री गिरीश महाजन पुणेकरांच्या पाण्यावर वारंवार तोंडसुख घेत असताना पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत, असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे. जलसंपदात काय जळते आहे ते महाजन यांनी आधी पाहावे, असा सल्लाही मंचाने त्यांना दिला आहे. त्यांना ते आठवत नसेल तर पुण्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांनी त्यांना ते माहिती करून द्यावे, असे मंचाने म्हटले आहे.जलसंपदामंत्री महाजन यांनी शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा पुण्याच्या पाण्यावर टीका केली व पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असा सल्लाही दिला. त्यावर बोलताना मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे म्हणाले. सन १९९९ झालेला ११.५० एमएलडी पाणी वापराचा करार, २० वर्षांत पुण्याची लोकसंख्या दुपटीने वाढली तरी नव्याने करण्यात आलेला नाही. त्यात जलसंपदा विभागाला अपयश आले आहे.पुणेकरांनी अधिकाधिक सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी सोडावे, असा अनाहुत सल्ला महाजन देतात, मात्र महापालिकेच्या मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरणासाठी उभारलेल्या जॅकवेलकडे दुर्लक्ष करतात. बेबी कालव्याच्या दुरुस्तीत जलसंपदाला अपयश आल्यामुळे हा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही, हे महाजन यांच्या गावीही नाही.पाण्याची गळती होते, यासाठीच महापालिकेने खडकवासला येथून पर्वतीपर्यंत बंद पाइपलाइनने पाणी आणले आहे. त्यावर महाजन कधी बोलत नाहीत, मात्र खडकवासला ते इंदापूर या मुठा उजव्या कालव्यातून होणारी ४० टक्के गळती थांबवण्यात त्यांच्या खात्याला अपयश आले, हेही ते कधी सांगत नाहीत.किती ठिकाणी : ते अपयशी झाले...पुण्याच्या पाण्याचे आॅडिट व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या महाजन यांनी प्रथम आपल्या खात्याचा अभ्यास करावा व किती ठिकाणी ते अपयशी झाले आहेत, त्याची माहिती घ्यावी, असे वेलणकर म्हणाले. महाजन पुणेकरांच्या पाण्यावर अशी अप्रत्यक्ष टीका करीत असताना पुण्याचे लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमदार, खासदार मात्र तोंडाला कुलूप लावून बसले आहेत, अशी खंत वेलणकर यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या पाण्यावरची टीका : ‘त्यांच्या’ तोंडाला कुलूप का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 3:41 AM