पिंपरी : दिवसाढवळ्या गोळीबार करून एकाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यात पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (krushna prakash) यांनी आरोपींवर पाठीमागून झाड फेकले. त्यामुळे आरोपी कोसळले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली. खेड तालुक्यातील कोये, कुरकुंडी गावात येथे रविवारी (दि. २६) रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही कारवाई केली.
गणेश हनुमंत मोटे (वय २३), महेश तुकाराम माने (वय २३), अश्विन आनंदराव चव्हाण (वय २१, तिघेही रा. सांगवी), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. यातील आरोपी गणेश मोटे हा तडीपार असून आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात आला होता. यापूर्वी गणेश बाजीराव ढमाले, प्रथमेश संदीप लोंढे, गणेश उर्फ मोनू सकपाळ, अक्षय गणेश केंगले, अभिजित भागूजी वारे, मुज्जमली इस्माईल आतार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एका विधीसंघर्षीत बालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणातील आणखी चार आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबरला सकाळी योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. आरोपी अश्विन चव्हाण याच्यासोबत आलेल्या आरोपी गणेश मोटे याने गोळीबार केला होता. यात जगताप याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी मोटे आणि चव्हाण फरार झाले होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. आरोपी मोटे, चव्हाण आणि महेश माने हे तिघेही चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये, कुरकुंडी गावाच्या हद्दीत एका शेताच्या कडेला पडक्या घरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या चार पथकांनी सापळा रचला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील या पथकासोबत होते.
आरोपी-पोलिसांमध्ये चकमकीचा थरारपोलिसांनी शेताच्या कडेला असलेल्या घराची पाहणी केली असता, घरात तीन जण असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करून पिस्तूलातून पोलिसांवर दोन राऊंड फायर केले. पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी झाडाझुडपातून पळून जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथे पडलेले झाड पाठीमागून आरोपींच्या अंगावर फेकले. त्यामुळे आरोपी जमिनीवर कोसळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले.
पोलीस आयुक्तांसह कर्मचारीही जखमीआरोपींच्या अंगावर झाड फेकताना तसेच त्यांच्याशी झालेल्या झटापटीत पोलीस आयुक्तांना खरचटले. तसेच चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांना देखील खरचटले असून ते देखील किरकोळ जखमी झाले. पोलिसांवर गोळीबार केला, शस्त्र बाळगले याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीनही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक आयुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर, सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, हरीश माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.