धायरी:सेवा रस्त्यालगत उभे राहून देहविक्री करणाऱ्या महिलांमुळे परिसरातील स्थानिक महिलांना आता घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने आता पोलीस आयुक्तांनीच याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.
मुंबई - बंगळुरू महामार्गालगत वडगांव बुद्रुक येथील सेवा रस्त्यालगत अनेक बार व लॉजिंग असल्याने या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिला दिवसभर उभ्या असतात. अशा वेळी परिसरात राहणाऱ्या स्थानिक महिला रस्त्यावरून जात असताना आंबट शौकीनाकडून विक्षिप्त चाळे करीत स्थानिक महिलांनाच झेडले जाते. याबाबत स्थानिकांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बऱ्याचदा तक्रारी करण्यात केल्या. मात्र तरीही देहविक्री करणाऱ्या महिला त्याठिकाणी दिवसभर थांबत असल्याने स्थानिक महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वडगांव बुद्रुक येथील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या सहयोग नगर, नारायण बाग परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्रीच्या व्यवसायाला चाप बसावा म्हणून पोलीस प्रशासन ठोस पावले उचलताना दिसून येत नाही. स्थानिक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने या परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांची गर्दी वाढत आहे. परिसरातील सोसायट्यामध्ये राहणाऱ्या स्थानिक महिलांना घराबाहेर जाणेही मुश्किल झाले आहे. काही स्थानिक महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला समजून काही आंबटशौकिनाकडून त्रास दिला जातो.
त्याचबरोबर नवले पुल परिसरात रात्री सेवा रस्त्याच्या बाजूला तृतीयपंथी उभे राहून येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना हातवारे करून विक्षिप्त प्रकारे चाळे करीत असतात. याबाबत स्थानिक नगरसेवक हरिदास चरवड यांनीही आंदोलन केले होते. त्याचबरोबर स्थानिकांनी बऱ्याच वेळेला पोलीस ठाण्यात वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी याबाबत अद्यापपर्यंत कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही.
चौकट :
स्थानिक पोलिसांकडून होतेय नावापुरतीच कारवाई...
सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या विरोधात पोलिसांच्या वतीने वेळोवेळी कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई झाल्यानंतरही दुसऱ्या दिवसापासून देहविक्री करणाऱ्या महिला या परिसरात पुन्हा येतात. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
कोट:
मी नारायण बाग परिसरात राहते. मात्र येथे सुरू असणाऱ्या अवैध धंद्यामुळे आम्हा महिलांना घराबाहेर जाणे अवघड झाले आहे. परिसरातून जाताना काहीजण आम्हालाच हातवारे करून विक्षिप्त चाळे करतात.
- एक स्थानिक महिला.