ग्रामपंचायत निवडणुकीत अंगठेबहाद्दरावर आयोगाची फुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:24+5:302020-12-24T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यात हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार अर्ज दाखल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यात हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सातवी पास असणारी व्यक्तीच उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे अंगठेबहादर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात बाहेर फेकले गेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने या पूर्वी केवळ सरपंच पदासाठी घातलेली शिक्षणाची अट सर्वच सदस्यांना देखील घातली आहे. निवडणूक आयोगाने आता उमेदवारीसाठी ७ पासची अट घातली आहे. उमेदवारी अर्जसोबत सातवी पास असल्याचा दाखला जोडणे बंधनकारक असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता अंगठेबहाद्दर राजकारणाच्या रिंगणातून बाहेर होणार आहेत. निवडणूक आयोगाने जानेवरी १९९५ नंतरचा जन्म असलेल्या उमेदवारांना ही अट लागू केली आहे. १९९५ च्या आधी जन्मलेल्या पुढाऱ्यांना मात्र ही अट लागू नाही. गावातल्या अंगठेबहाद्दर पुढाऱ्यांना हा मोठा फटका बसणार आहे.