कोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये शहीद झालेल्या शूरांचा आम्हाला अभिमान असून त्यामुळेच प्रत्येक वर्षी येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येत असतो. येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता सरकारच्या वतीने येथील परिसराचा विकास करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पवार उपस्थित होते. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत आदी उपस्थित होते.
१ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या लढाईनंतर सर्वजण देशाच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाले असल्याने आजचा शौर्य दिवस म्हणजे देशाच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा दिवस आहे.- अॅड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
कोरेगाव भीमा येथे २०३ वर्षांपूर्वी शहिदांनी केलेल्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी २५ वर्षांपासून मी येत आहे. हा विजयस्तंभ कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारा असून भीमा कोरेगावचा इतिहास पाठ्यपुस्तकात येण्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र दिलेले आहे.- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री