किर्लोस्कर न्यूमॅटिकमधून १३१ कामगारांना कंपनीने तडकाफडकी काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:43 AM2018-08-24T04:43:25+5:302018-08-24T04:43:44+5:30
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीमधील १३१ कामगारांना काढण्यात आल्याने त्यांनी कंपनीसमोर गेले चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
हडपसर : किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीमधील १३१ कामगारांना काढण्यात आल्याने त्यांनी कंपनीसमोर गेले चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. कामगारांच्या नोकरीच्या हमीसाठी त्यांनी युनियन केल्याने कंपनीने हा निर्णय अचानक घेऊन कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण केला आहे. याबाबत या कामगारांनी कामगार आयुक्तांकडे निवेदन देऊन कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची मागणी केली आहे.
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतील किर्लोस्कर न्यूमॅटिक कामगार संघटनेतील सर्वच्या सर्व म्हणजे १३१ कामगारांना बडतर्फ केले आहे. त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगार आयुक्त यांनी व्यवस्थापनाशी समोरासमोर समेट घडवून कामगारहिताचा योग्य तो निर्णय घेऊन बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यास व्यवस्थापनाला प्रवृत्त करावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यंत कामगारांना परत कामावर रुजू करून घेत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अभिजित अडागळे, उपाध्यक्ष लकन तांबे, जनरल सेक्रेटरी सचिन सुरवसे, जॉईन्ट सेक्रेटरी अशोक गंजाळ, खजिनदार अंबादास चाकणे, सदस्य बिपीन कावळे, अजित देवकर यांनी दिला आहे.