उरवडे येथील अग्नितांडव प्रकरणी कंपनी मालक निकुंज शहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:25 PM2021-06-09T15:25:54+5:302021-06-09T15:40:25+5:30
उरवडे येथील सव्हीए अॅक्वा कंपनीत आगीची भीषण आगीची घटना सोमवारी घडली. त्यात 18 निरपराध जणांना त्यांचा जीव गमवावा लागला.
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एसव्हीएस कंपनीचा मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) याच्यावर पौड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहा याला मंगळवारी( दि.८) अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर शहा याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एस. बी गणपा यांनी हा आदेश दिला आहे.
निकुंज शहा ( वय ३९ रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्यांच्यासह याप्रकरणी बिपीन शहा( वय ६८ रा .सहकारनगर) , केयुर बिपीन शहा ( वय ४१, मूळ रा सहकारनगर, रा . दुबई) आणखी दोन जणांवर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.
सोमवारी (दि .८ जून) एसव्हीए अॅक्वा कंपनीला आग लागून त्यात १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियनाचे पालन न केल्यास तसेच अनाधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.
कंपनीच्या मालकाला न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील निलेश लडकत यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा भीर स्वरूपाचा असून, या प्रकरणातील अन्य दोन आरोपीला अटक करायचे असल्याने आणि पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. आरोपीच्या बाजूने ऍड हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. मात्र न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
....
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मृतांच्या कुटुंबियांची मागणी..
उरवडे येथील एसव्हीए अॅक्वा कंपनीला केवळ क्लोरोक्नीनच्या गोळ्यांच्या पँकिंगची आणि पावडर तयार करण्याची परवानगी होती. फक्त याचाच परवाना असताना सॅनिटायझर प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरण्याचे काम मालकाने या ठिकाणी सुरू केले होते. हे अतिशय धोकादायक रसायन असल्यामुळेच या ठिकाणी ही आगीची भीषण घटना मोठी घटना सोमवारी घडली. त्यात १८ निरपराध जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली होती.
चौकशी समितीने दिला अहवाल....
याप्रकरणी स्थापन केलेल्या उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षेतखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात परवानगीपेक्षा अधिक ज्वालाग्रही पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणावर केला होता. त्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. ज्वालाग्रही कच्चा माल साठवणुकीचे ठिकाण व काम करण्याच्या जागा एकच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रसायनांनी पेट घेऊन स्फोट झाला व आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. समितीच्या अहवालानंतर ग्रामीण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन निकुंज शहा याला अटक केली आहे. समितीच्या अहवालात १२ मुद्यांचा समावेश आहे.