"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर
By नितीन चौधरी | Published: November 25, 2023 04:55 PM2023-11-25T16:55:05+5:302023-11-25T16:57:24+5:30
डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे...
पुणे : “आजारपणानंतर मी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होतो. मात्र, मी तक्रार करायला गेलो असे पसरविण्यात आले. तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही,” असे सडेतोड प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे.
पुण्यातील विविध शासकीय इमारतींच्या कामाच्या आढाव्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाच्या आंदोलनावरून राज्य पेटलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूमुळे सुमारे पंधरा दिवस आजारी होते. मात्र, वृत्तवाहिन्या तसेच वर्तमानपत्रांमधून पवार यांचा हा आजार राजकीय असल्याचे चित्र पसरवण्यात आले. त्याचे वाईट वाटल्याचे सांगून मी लेचा पेचा माणूस नाही असे स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले. गेली ३२ वर्षे मी माझी मते स्पष्टपणे लोकांसमोर मांडत असून राजकीय आजार दर्शविण्याचा माझ्या स्वभावात व रक्तात नाही असे त्यांनी यावेळी ठासून सांगितले. आजारपणातून उठल्यानंतर पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यास नवी दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी महायुतीतील शिवसेना तसेच भाजपची तक्रार करायला गेल्याचे चित्र रंगवण्यात आले त्यावरही नाराजी व्यक्त करत पवार यांनी तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही, असे सडेतोड उत्तर दिले. सर्वांना सोबत घेऊन काम करणे ही राज्याची संस्कृती व परंपरा असून ती चालवली पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले.
सरकार अस्थिर कसे?
यावरूनच राज्य सरकार अस्थिर असल्याचेही विरोधक आरोप करत असल्याबाबत विचारले असता, २०० आमदारांचा पाठिंबा असताना हे सरकार अस्थिर कसे असा सवालच त्यांनी विरोधकांना विचारला. विकासाला महत्त्व देऊन आपण पुढे जात असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. आमदार अपात्रतेच्या कारणावरून काही लोक सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांकडे अपिलात गेले आहेत. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार असल्याचे सांगत ही वेगळी प्रक्रिया असून त्याचा सरकार स्थिर असल्याची काही संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबाबत राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसून महायुती सरकार म्हणून राज्य सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येकाने काळजी घ्यावी
आंतरवली सराटी येथे झालेल्या दगडफेकीबाबत एकाला अटक करण्यात आली आहे, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, “राज्यात जाणीवपूर्वक कुणीही त्रास देत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्यात अधिकारी देखील असल्यास त्यांच्यावर कारवाई झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देत आहेत. मनोज जरांगे असो की राज्य सरकारमधील कोणीही असो कुणीही भडकाऊ भाषा वापरू नये. एखाद्या शब्दाने समाजात तेढ निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.”
हिताचा निर्णय घेऊ
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी ४०० कोटींचा निधी मागितला असल्याचे वृत्त वाचले असून मुंबईला गेल्यावर याबाबत माहिती घेईल असे त्यांनी स्पष्ट केले. आयोगाला दिलेल्या अधिकारात तसेच स्वायत्ततेत ते काम करत असून आयोगाच्या मागण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करू व राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.