आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजापूर ही अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत राजपूर, गाडेवाडी, उंडेवाडी, पालखेवाडी, न्हावेवाडी, शिवाजीनगर वस्ती, शेंगाळवाडी, अशा वाड्या येत असल्यामुळे महसुलाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत महत्त्वाची समजली जाते. परंतु ग्रामविकास अधिकारी हा मनमानी कारभार करत असून ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणारी विकास कामे ग्रामस्थ व सदस्य सरपंच यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीचा ठेकेदार असणाऱ्या ठेकेदाराशी संगनमताने कामे करत असल्यामुळे ही कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीची होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर निघत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत राजपूर- गाडेवाडी येथील ग्रामसेवक यांनी कोविड -१९ च्या काळात लोकप्रतिनिधींना सहकार्य केले नाही. ते आठवड्यातील एक दिवस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर असतात. नागरिकांना त्यांची तासनतास वाट पाहत ताटकळत बसावे लागते. अपंग व्यक्तींचे मानधन, अनुदान जाणीवपूर्वक आजपर्यंत दिले नाही. विवाह नोंदणी करण्यासाठी शासना नियम व्यतिरिक्त जादा रक्कम आकारली जात आहे.
याबाबत काहींना पावती दिली जाते तर काहींना दिली जात नाही. परंतु ज्यांना पावती दिली जाते ती कोणत्या पुस्तकातून दिली आहे याची चौकशी व्हावी. तसेच स्थानिक ग्रामस्थ वारंवार जॉब कार्डची मागणी करून सुध्दा जॉब कार्ड देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गाडेवाडी व पालखेवाडी येथील अंगणवाडी दुरूस्तीची कामे अंदाजपत्रकानुसार झाली नाही. परंतु काम कमी प्रमाणात असताना बिल ज्यादा काढून संबंधित रक्कम देण्यात आली आहे. लोकांशी संपर्क नसल्यामुळे वैयक्तिक किंवा सार्वजनिक लाभाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत जात नाही, याबाबत संबंधित ग्रामसेवकाची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आदिवासी भागाच्या दौऱ्यावर असताना अनेक ग्रामस्थांनी ग्रामसेवक बाबत तक्रारी केल्या परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातले. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रकांत लोहकरे, सागर भोते, वामन लोहकरे, शंकर लोहकरे,श्रीकांत लोहकरे चंदर लोहकरे व राजापूर गाडेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.