तक्रारीची कुलगुरूंकडूनच टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:00 AM2018-07-10T03:00:16+5:302018-07-10T03:00:31+5:30

विविध प्रश्न घेऊन कुलगुरूंकडे येणा-या विद्यार्थ्यांना भेट देण्यासही कुलगुरूंकडून नकार दिला असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

 The complaint was made by the Vice Chancellor | तक्रारीची कुलगुरूंकडूनच टोलवाटोलवी

तक्रारीची कुलगुरूंकडूनच टोलवाटोलवी

googlenewsNext

पुणे - एका इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये परीक्षेच्या दरम्यान घडत असलेले गैरप्रकार, बेकायदेशीर नेमणुका, आर्थिक गैरप्रकार याची माहिती देण्यासाठी कुलगुरू कार्यालयात आलेल्या त्या महाविद्यालयाच्या माजी कार्यालयीन अधीक्षकला कुलगुरू, प्र-कुलगुरू, परीक्षा विभागाचे प्रमुख, उपकुलसचिव व पुन्हा कुलगुरू कार्यालय असे गेले २० दिवस फेऱ्या मारायला लावून टोलवाटोलवी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. त्याचबरोबर विविध प्रश्न घेऊन कुलगुरूंकडे येणा-या विद्यार्थ्यांना भेट देण्यासही कुलगुरूंकडून नकार दिला असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
नºहे येथील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये योगेश ढगे हे कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत होते. महाविद्यालयातील काही बेकायदेशीर बाबींना कंटाळून मी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये घडत असलेल्या या गैरप्रकारांना वाचा फुटावी यासाठी त्यांनी कुलगुरूंकडे धाव घेतली असता अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागल्याची तक्रार योगेश ढगे यांनी केली आहे.
योगेश ढगे यांनी सांगितले, मी गेल्या दहा वर्षांपासून इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये नोकरी करीत होतो. सुरुवातीला मी अकाऊंट म्हणून काम केले, त्यानंतर अधीक्षक म्हणूनही मी काम पाहिले. त्यामुळे महाविद्यालयांमधील बहुतांश आर्थिक व्यवहार, कामकाज याची मला जवळून माहिती आहे.
परीक्षा विभागातील गैरप्रकारांची माहिती देण्यासाठी मी १८ जून २०१८ रोजी कुलगुरू कार्यालयामध्ये जाऊन डॉ. नितीन करमळकर यांची भेट मागितली. त्या वेळी कुलगुरूंना कोणत्या गैरप्रकारांबाबत माहिती द्यायची आहे, याचा लेखी तक्रार अर्ज कार्यालयामध्ये दिला होता. मात्र कुलगुरूंनी त्यांना भेट देण्यास नकार देऊन प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार प्र-कुलगुरूंच्या कार्यालयामध्ये असता तिथेही त्यांना परीक्षा विभागाचे प्रमुख अशोक चव्हाण यांना भेटण्यास सांगितले. चव्हाण यांनी उपकुलसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे पाठविले. त्यानंतर कुलगुरूंकडे जा असे मला सांगण्यात आले. अखेर २७ जून २०१८ रोजी कुलगुरूंनी भेट देऊन याप्रकरणी चौकशी समिती नेमली असल्याची जुजबी माहिती दिली. कुलगुरूंकडे महाविद्यालयांमधील व कॅम्पसच्या विभागांमधील विद्यार्थी, शिक्षक त्यांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी घेऊन भेटण्यास येत असतात. अनेक विद्यार्थी बाहेरगावाहून येत असतात. मात्र, बहुतांश वेळा कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांना भेटण्यास नकार दिला जातो. त्यांना प्र-कुलगुरू, कुलसचिव किंवा उपकुल सचिवांना भेटण्यास सांगितले जाते. मात्र, विद्यार्थी तिथे गेले असता तिथूनही जुजबी माहिती देऊन परत पाठविले जाते.

२४ तास उपलब्ध राहण्याचे काय?
डॉ. नितीन करमळकर यांनी कुलगुरू पदाचा कार्यभार घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी २४ तास उपलब्ध राहणार असल्याच्या मुलाखती दिल्या होत्या. मात्र अनेक विद्यार्थी त्यांच्या तक्रारी घेऊन कुलगुरूंकडे गेले असता त्यांना भेट नाकारली जात आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या २४ तास उपलब्ध राहण्याच्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

फोन उचलण्यासही टाळाटाळ
नगर जिल्ह्यातील सिनेट सदस्यांना एका महत्त्वाच्या विषयाबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी बोलायचे होते. त्यासाठी ते दोन दिवसांपासून त्यांच्या फोनवर संपर्क साधत होते. मात्र त्यांचा फोनच उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर पुण्यातील त्यांच्या एका मित्राला कुलगुरू कार्यालयात पाठविले. त्या मित्राने कुलगुरूंच्या स्वीय सहायकाची भेट घेतल्यानंतर सिनेट सदस्यांचा कुलगुरूंशी संपर्क झाला.

कुलगुरूंना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या
पीएचडी व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांचे बंद केलेल्या विद्यावेतनाच्या प्रश्नावर ४ दिवसांत तोडगा काढू, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र १५ दिवस उलटले तरी त्याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने सोमवारी याबाबत त्यांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ गेले होते. मात्र भेटण्यास नकार दिला. त्यामुळे कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर कुलगुरूंनी धावती भेट घेतली. विद्यावेतनाबाबतचे परिपत्रक दोन दिवसांत संकेतस्थळावर टाकले जाईल, असे सांगितले.

योगेश ढगे यांना भेटण्यास नकार देण्यात आला, या त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असल्याने त्यांना भेटलो नाही. ढगे यांना त्यांचे म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनाही मी उपलब्ध असतो.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

Web Title:  The complaint was made by the Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.