जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 01:26 AM2018-08-06T01:26:25+5:302018-08-06T01:26:38+5:30

जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

Complete the sowing of Kharipa in the district | जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण

Next

पुणे : जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या जवळपास अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आतापर्यंत ९९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर (उसाशिवाय) क्षेत्र असून, या पैकी २ लाख ३० हजार ४५२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
सर्वाधिक ५० हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. तर १ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर रागी रोपवाटिकेच्या पेरण्या झाल्या. यावर्षी प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून ३४२ टक्के एवढ्या क्षेत्रावर लागवडी झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसात खंड पडला आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
पुणे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८२९.१० मि.मी. एवढे आहे. जून नैर्ऋत्य मोसमी पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची लगबगही सुरू झाली. जिल्ह्यात खरीप पिकांचे २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत २ लाख ३० हजार ४५२ क्षेत्रावर पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी मका आणि इतर तृणधान्य यांची जवळपास ९४ हजार ५९६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. तर ९० हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला, फूल आणि चारा या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्याच्या पश्चिम भागात भातपिकाचे क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्टर आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात केवळ ५ हजार ८२0 क्षेत्रावर भातलावणी झाली. नंतर पावसामध्ये खंड पडल्यामुळे पुनर्लागवड लांबली असून, आजअखेर ५० हजार ८१४ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या आहेत.
शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या भागात बाजरीचे पीक घेतले जाते. सर्वसाधारण ४४ हजार ९४ हेक्टरवर बाजरी पीक घेतले जाते. आतापर्यंत २८ हजार ७९३ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र सरासरी ११ हजार १८३ हेक्टर असून, आतापर्यंत १२ हजार ५५३ हेक्टरवर मक्याच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सरासरी ३ हजार ५५३ हेक्टरवर तुरीचे पिके घेतले जाते. यावर्षी या क्षेत्रात घट झाली असून केवळ ७०६ हेक्टरवर म्हणजे २० टक्केच पेरणी झाली आहे.
>सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ
जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र सरासरी ५ हजार १९९ हेक्टर एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि बारामती या तालुक्यांत सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते.यावर्षी तब्बल १७ हजार ७८३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर कांदाच्या क्षेत्रही वाढले असून, गतवर्षी २ हजार १५५ हेक्टरवर कांद्याचे उत्पादन करण्यात आले. यावर्षी ३ हजार ७७४ हेक्टरवर कांद्याची रोपे लावण्यात आली. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यापासून पेरणीच्या अंतिम टप्प्यात पावसाने दडी मारली आहे. मुगाचे क्षेत्र ८ हजार ६९ हेक्टर असून, आतापर्यंत ५ हजार ९०० म्हणजेच ७३ टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीच्या वेळी पावसामध्ये खंड पडल्यामुळे मूग पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्र ४१ हजार ४०९ हेक्टर असून, आतापर्यंत ३३ टक्के म्हणजे १३ हजार ७०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात तूर, मूग, उडीद यासह इतर खरीप कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कडधान्याच्या क्षेत्रात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.गतवर्षी २ हजार १७० हेक्टरवर तूर पेरणी करण्यात आली. यावर्षी केवळ ७०६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. १७ हजार ७२० हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यावर्षी ५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Web Title: Complete the sowing of Kharipa in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी