पुणे : शहर आणि जिल्ह्यातील डीएसके समूहाच्या गृहप्रकल्पांमधील सदनिकांचा ताबा विहित कालावधीत न मिळाल्याने गृहप्रकल्पांमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) तक्रार केली आहे. महारेराने या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला डीएसके समूहाच्या मालमत्ता जप्त करून संबंधितांचे पैसे देण्याबाबत सूचना केल्या आहेत.डीएसके समूहाच्या विविध गृहप्रकल्पांमधील सदनिकांसाठी अनेक नागरिकांनी नोंदणी केल्या आहेत. त्यातील अनेक नागरिकांनी गृहकर्ज काढून संबंधित रक्कम डीएसके समूहाकडे दिली. तसेच बँकांकडून या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत. परंतु, दिलेल्या मुदतीत अनेक नागरिकांना सदनिकेचा ताबा मिळालेला नाही. सदनिका ताब्यात नसताना दर महिन्याला बँकेकडून कर्जाचे हप्ते वसूल होत आहेत. त्यामुळे काही नागरिकांनी महारेराकडे याबाबत तक्रारी दिल्या आहेत. त्यावर महारेराने तक्रारींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी पाठविल्या आहेत. मात्र, वसुली संचालनालयाने डीएसके समूहाच्या सर्व मालमत्ता जप्त केल्याने कोणती मालमत्ता जप्त करायची, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने महारेराकडे मागितली आहे, असे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
डीएसकेच्या मालमत्ता जप्त करा - महारेराचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:49 AM