धायरी: आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादन होणारा ओजी-कुश नावाचा गांजा घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेऊन एकूण ०३,५३,६८०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अक्षय प्रकाश शेलार (वय-२५ वर्ष, रा. करण संकल्प सोसायटी, बावधान, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम उघडली असुन त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अमली पदार्थाविरुध्द कड़क कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गुन्हे प्रतिबंधात्मक टीम पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला व धनाजी धोत्रे यांना मिळालेल्या बातमीवरुन, वडगांव बुद्रुक येथील दी स्मोक शॉप समोरील सार्वजनिक रस्त्यावर गंगा भाग्योदय सोसायटी जवळ एक व्यक्ती त्याच्या पाठीवर काळया रंगाची बॅग अडकवून अंमली पदार्थ विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ ७२ ग्रॅम वजनाचा ओजी-कुश हा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना आढळला. हा अमली पदार्थ हा अफगाणिस्तान , कॅनडा, अमेरिका या देशात उत्पादित होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील गांजा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, अविनाश शिंदे, पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे, अविनाश कोंडे, रफिक नदाफ यांच्या पथकाने केली आहे.