‘काँग्रेस कनेक्ट’ अभियानाचा पुण्यातून होणार शुभारंभ; अशोक चव्हाण करणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:24 PM2017-11-30T12:24:09+5:302017-11-30T12:35:23+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
पुणे : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ, १२५ वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, विद्यापीठे आणि विद्यमान सरकारची धोरणे, रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदान याबद्दल परिसंवाद, दिव्यांग मुलांसोबत आनंदोत्सव, चित्रकला स्पर्धा, सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम, तरुणांसाठी नोकरी मेळावा, जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात बचतगटातील महिलांचा स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे असणार आहेत.
सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, शरद रणपिसे, रमेश बागवे, अनंत गाडगीळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सध्या, काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काहीही केले नाही, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे या काँग्रेसी योजनांचाच लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षित वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याकरिता ‘काँग्रेस कनेक्ट’ हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे.
या उपक्रमांतर्गत युवा पिढीला, सुशिक्षित मध्यमवर्गीयांना काँग्रेसने देश उभारणीत दिलेल्या कार्याची माहिती देणे, त्यांच्या मनात पेरण्यात आलेले काँग्रेसविषयीचे गैरसमज दूर करणे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहून काँग्रेसविषयी अधिकाधिक माहिती देणे, आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा, १२५ वर्षे झालेल्या गणेश मंडळांचा सन्मान, तसेच परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले़