काँग्रेसचा ‘संविधान बचाव’चा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 08:48 PM2019-04-12T20:48:40+5:302019-04-12T20:49:16+5:30
नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आले असून दलित अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत काँग्रेस व मित्रपक्ष-संघटनांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिला आहे. आता प्रचारामध्ये ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत संविधान बचाव कोपरा सभा व संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला जाणार आहे.
पुणे : नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आले असून दलित अल्पसंख्यांकावरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत काँग्रेस व मित्रपक्ष-संघटनांनी ‘संविधान बचाव’चा नारा दिला आहे. आता प्रचारामध्ये ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत संविधान बचाव कोपरा सभा व संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला जाणार आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहूल डंबाळे यांच्यासह पिपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट), दलित पँथर, भीम आर्मी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, स्वारिप युथ रिपब्लिकन आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बागवे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात संसदीय लोकशाही प्रणाली धोक्यात आली आहे. देशभरात मागील पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांमध्ये दलित व अल्पसंख्यांकाना लक्ष्य करण्यात आले. संविधान बदलण्याची भाषा त्यांचे मंत्री उघडपणे करत आहेत. विविध शासकीय संस्थांचा दुरूपयोग सुरू आहे. संविधानात्मक हक्क अधिकार व संस्थांची पायमल्ली सुरू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ‘माझे संविधान माझी जबाबदारी’ हे अभियान दि. २० एप्रिलपर्यंत राबविले जाणार आहे.
अभियानांतर्गत शहरातील दलित, अल्पसंख्याक तसेच इतर समाज घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी शंभरहून अधिक संविधान बचाव कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. यामध्ये दोन्ही काँग्रेससह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी सहभागी होत आहेत. शुक्रवारपासून या सभांना सुरूवात झाली आहे. तसेच दि. १४ एप्रिलपासून संविधान बचाव संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.
प्रकाश आंबेडकरांमुळे मतांचे विभाजन
वंचित विकास आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर मतांचे विभाजन करून जातीयवादी पक्षांना मदत करत असल्याचा आरोप रमेश बागवे व राहूल डंबाळे यांनी केला. पण दलित चळवळीतील कार्यकर्ते आंबेडकरांना मदत करणार नाहीत. रिपल्बिकनचे गट एकत्र येऊन निवडणुक लढविण्याचा प्रयोग आधी झाला होता. पण त्यात यश आले नाही. उलट भाजपा-शिवसेनाला फायदा झाला. काँग्रेससोबत गेल्यानंतर चार खासदार झाले होते. त्यामुळे आम्ही काँग्रेसला सहकार्य करणार असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.