आता बीए, बीकॉम साठी सुद्धा सीईटी? पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी घेण्याचा विचार सुरू :उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 08:20 PM2021-06-05T20:20:36+5:302021-06-05T20:21:48+5:30
सप्टेंबर मध्ये सुरू होणार कॉलेज तर जुलै मध्ये सीईटी
राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रम अर्थात बिएस्सी, बी.ए, सारख्या अभ्यासक्रमांना सीईटी घ्यावी का याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या बरोबरच इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी जुलै अखेर पर्यंत होऊन सप्टेंबर पर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू होतील असे देखील त्यांनी सांगितले.
पुण्यामध्ये आज सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान शैक्षणिक वर्ष कोरोना आटोक्यात येई पर्यंत ऑनलाइनच सुरू राहील असे ते म्हणाले.
सामंत म्हणाले " कालच सीईटीच्या लोकांची बैठक झाली. प्रोफेशनल कोर्सेसला सीईटी नेहमी प्रमाणे पार पडेल.. इतर प्रवेशांसाठी वेगळा विचार करावा का याबाबत मतमतांतरं आहेत.. म्हणून बोर्डाचे निकाल आले की निर्णय घेतला जाईल. यासाठी व्हाईस चॅन्सलर्सची समिती नेमून निर्णय घेण्यात येणार आहे.सीईटीची परिक्षा केंद्र दुप्पट करणार आहोत. जुलै पर्यंत परिक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत"
दरम्यान महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचारले असता,"जोपर्यंत कोव्हीड आटोक्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे योग्य होणार नाही." असं सामंत म्हणाले
महाविद्यालयांच्या शुल्काबाबत निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जितके दिवस कॅालेज बंद आहे त्यासाठी एफआरए समितीची मुदत संपली आहे.त्यासाठीची समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल. ती मंजूर झाली की तातडीने बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या महाविद्यालयांच्या फी बाबत तक्रारी येतील त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्याच्या सुचना दिली असल्याचंही ते म्हणाले.शुल्क नियंत्रण समिती खासगी विद्यापीठांसाठी देखील करावी या मताचा मी देखील आहे असा दावा सामंत यांनी केला.
"सप्टेंबर मध्ये सगळे कॅालेज सुरु करण्याच्या मनस्थितीत आहोत.उच्च आणि तंत्रशिक्षणासाठी प्लॅन तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण
मराठा आरक्षणाबाबत बोलताना "आरक्षणाबाबत सावध भुमिका कधीही घेतली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची भुमिका आहे. जे गैरसमज पसरवतात त्यांचं कोण किती ऐकतात ते माहित नाही. संभाजराजेनी जी भूमिका मांडली आहे त्याचा विचार सरकार करते आहे. ते समाजाचं प्रतिनिधीत्व करतात" असे सामंत म्हणाले.