तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे यांनी विविध सामाजिक संघटना कोविड सेंटरसाठी मदतीचे आवाहन केले होते. ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी बाल कोविड वाॅर्डसाठी ध्रुव संस्थने मदत करून वाॅर्ड दत्तकच घेण्यासाठी विनंती केली असता तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी वाॅर्ड सुशोभीकरण व आतील वाॅर्डरचना करण्यासाठी परवानगी देण्यास सुचवले होते. ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून १ ते १० वयोगटातील मुलांची आवड लक्षात घेऊन व मुलांची हॉस्पिटलची भीती घालविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने बाल कोविड वाॅर्डची रचना केली आहे. त्यामध्ये कार्टून, स्पोर्ट्ससह ४२ इंची डिशसह टीव्ही, सर्व बैठे खेळ त्यामध्ये कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, सापशिडी, चित्रकला साहित्य, टेडीबियर, छोटा भीमसारख्या बाहुल्या, गोष्टींची पुस्तके, साउंड सिस्टीम, सर्व भिंती कलरफुलमध्ये कार्टून चित्र रंगवली असून, संभाव्य कोरोनाग्रस्त मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध ठेवला जाणार आहे. ध्रुव प्रतिष्ठानने तयार केलेल्या बाल कोविड वाॅर्डचे आज उपजिल्हा रुग्णालयाकडे भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते फित कापून हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. आनंद साबणे, डॉ. लिंगेश्वर बिरूळे, पत्रकार सारंग शेटे, अमोल मुऱ्हे, रवी कंक, सचिन देशमुख, नीलेश खरमरे, पांडुरंग शिवतरे, राहुल खोपडे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
धुव्र प्रतिष्ठानकडून बाल कोविड वार्डची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:12 AM