‘मोदीभक्ता’कडून मोदी मंदिराची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:40+5:302021-08-17T04:14:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाषाण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाषाण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. औंध गावात हे मंदिर असून यात मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून तीही येथे मोठ्या फलकावर झळकावण्यात आली आहे. मोदींचे हे पुण्यातील पहिलेच मंदिर असून, देशपातळीवरही या प्रकारचे पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला जात आहे.
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व अन्य कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारले आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी ॲड. मधुकर मुसळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती फार मोठे योगदान आहे. त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे आज भारताला जागतिक स्तरावर चांगले स्थान प्राप्त झाले आहे. या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे आचार-विचार जोपासले जावेत. त्यांच्या कार्यापुढे सर्वांनी नतमस्तक व्हावे. मोदी हे एक प्रकारे देव असल्यानेच त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे.”
मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता ‘मोदी भक्तां’साठी मंदिराजवळील फलकावर लावण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचा अर्धाकृती पुतळा असलेल्या या मंदिराला स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. नगरसेविका अर्चना मुसळे, ॲड. मधुकर मुसळे, केसारामजी परिहार, शेखर विघ्ने, ओमरामजी चौधरी, मिलिंद कदम, आशुतोष देशपांडे, अक्षय सांगळे, संकेत सांगळे, वेलारामजी चौधरी, विनय शामराज आदी या वेळी उपस्थित होते.