पुणे : भात पिकातील तण नियंत्रित करावे आणि अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी नत्र आणि स्फुरदच्या गोळ्या टाकाव्यात, तसेच जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी नाचणी, भुईमूग आणि सोयाबीनच्या शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे, असा सल्ला कृषी हवामान प्रभागाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी दिला आहे. भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभागाच्या वतीने राज्यासाठी मंगळवारी (दि. १७) कृषी सल्ला जाहीर करण्यात आला. खरीप पिकांची पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी करताना २० टक्के अधिक बियाणे वापरावेत असा सल्ला पुणे, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील कापूस पट्ट्यात शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळे लावावेत. तसेच जिनिंग मिलच्या आसपासच्या २ किलोमीटर क्षेत्रातही असे सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप पिके, भाजीपाला आणि फळबागांमधील अतिरिक्त पाणी चराद्वारे बाहेर काढावे असेही सुचविण्यात आले आहे. कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जास्त पाऊस झालेल्या भागात नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मका आणि ऊस लागवड झालेल्या शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. भात आणि नाचणी पिकाची पुर्नलागवड लवकरात लवकर करावी असा सल्ला देण्यात आला आहे. लवकर लागवड झालेल्या भात पिकामध्ये तण नियंत्रण करावे. तसेच, अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा या साठी भात शेतात नत्र आणि स्फुरदच्या १६९ किलो गोळ्या प्रतिहेक्टर द्याव्यात, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
भात पिकासाठी तण नियंत्रण करा : कृषी विभागाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:51 PM
भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभागाच्या वतीने राज्यासाठी मंगळवारी (दि. १७) कृषी सल्ला जाहीर करण्यात आला.
ठळक मुद्देपेरणी न झालेल्या ठिकाणी २० टक्के जास्त बियाणे वापरावीत