लक्षणविरहित रुग्णांना त्रास कमी असला तरी त्यांच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी कोणाचाही संपर्कात येवू नये. लक्षणविरहित रुग्णांच्या निष्काळजीपणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञनी सांगितले.
फेब्रुवारी पासून सुरू झालेली रुग्ण वाढ ही आता उच्चांक गाठत आहे. रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. सुरुवातीला रुग्ण वाढ होत असताना लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे बहुतांश रुग्णांनी गृहविलगीकरणात उपचार घेणे पसंत केले. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी कोणाच्याही संपर्कात न येता विलग राहणे बंधनकारक आहे. अशा रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आणि यातील काही रुग्ण बाहेर फिरल्यामुळे संसर्ग वाढला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, फेब्रुवारी पासून सुरू झालेली ही रुग्ण वाढ साधारण मे पर्यँत राहू शकते. अनेक रुग्णांनी लवकर उपचार घेतले नाहीत. दुखण अंगावर काढल, वेळेत तपासणी करून घेतली नाही. सौम्य लक्षण आहेत म्हणून अनेकांनी दुर्लक्ष केले. यामुळे सध्या रुग्ण वाढ आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचा अंदाज आहे. लक्षणविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने पूवी सारखे स्थिती येणार नाही. असा अंदाज सुरूवातीला व्यक्त केला जात होता. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात मागील चार दिवसात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लक्षणविरहित आणि गृहवीलगिकरणात असलेल्यानी ही काळजी घ्या
- कोणाच्याही संपर्कात येवू नका. - विशेषतः घरातील लहान मूल आणि ज्येष्ठ नागरिकांपासून दूर राहा. - बरे होई पर्यँत वेगळ्या स्वछतागृहाचा वापर करा- घरात राहणे शक्य नसल्यास कोविड सेंटरला दाखल होणे गरजेचे आहे. - सौम्य लक्षण असले तरीही रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, एक्सरे आदी तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या. - स्वतः चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर घरातील सर्वांच्या तपासण्या करून घ्या. वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील सांगितले की, रुग्णांनी दुखणं अंगावर काढू नये. वेळेत उपचार केले तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. गंभीर रुग्णांना वेळेत प्लाझ्मा आणि रेमडीसीव्हर दिल्यास बरे होण्यास मदत होते. मागील काही दिवसांपासून लक्षणविरहित रुग्णांबरोबरच गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वेळेत तपासणी करणे आवश्यक आहे. लक्षणविरहित रुग्ण आणि गृहविलगीकरणात असलेल्यांनी काळजी घ्यावी. त्यांच्यामुळे इतरांना त्रास होवू शकतो. ताप आल्यास किंवा कोणताही त्रास झाल्यास स्वतःच्या मनाने गोळ्या, औषध घेवू नये.