पुणे : राज्यात कोरोनामुळे १ हजारपेक्षा जास्त माजी सैनिकांचे मृत्यू झाले. माजी सैनिक विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून मदतीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्यांना करून देण्यात आली.
माजी सैनिक कल्याण मंडळाचे संचालक प्रमोद यादव व उपसंचालक निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव यांनी ही माहिती दिली. माजी सैनिकांना निवृत्ती वेतन मिळते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला ते सुरु राहते. दुर्देवाने पत्नीचेही निधन झाले तर त्यांची मुले २५ वर्षांची होईपर्यंत त्यांंना हे निवृत्ती वेतन मिळते.
कोरोनामुळे निधन झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबांना याबाबत काही अडचण आल्यास मंडळाच्या वतीने सर्व त्रुटी दूर करून दिल्या जातात असे जाधव यांंनी सांगितले. सैन्य विभागाच्या वतीने माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची नेहमीच काळजी घेतली जाते. कोरोना काळात ज्यांंना कोरोनाची बाधा झाली त्यांना गृह विलगीकरणासाठी आलेला सर्व खर्च आरोग्य योजनेतून देण्यात आला अशी माहिती जाधव यांनी दिली.