Corona virus : पुणे शहरात आणखी ३५ रूग्ण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांच्या वाढीचे सत्र मात्र कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:06 PM2020-04-22T22:06:23+5:302020-04-22T22:11:30+5:30
शहरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२२ नव्याने ६४ रूग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू
पुणे : पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णांचे कोरोनामुक्त होऊन घरी परतण्याचे प्रमाण सध्या वाढत असून, आज तब्बल ३५ जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२२ झाली आहे. दरम्यान कोरोनाबाधितांच्या वाढीचे सत्र मात्र कायम असून आज नव्याने ६४ रूग्ण आढळून आले असून, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७७२ झाली आहे़ तर आज ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका हद्दीत बुधवारी रात्री साठेआठपर्यंत नव्याने आढळून आलेल्या ६४ रूग्णांपैकी नायडू हॉस्पिटलमध्ये ४८, ससून हॉस्पिटलमध्ये ७ व अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये ९ जण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून, रविवारपर्यंत असलेली ५८६ कोरोनाबाधित रूग्ण संख्या आज ७२२ वर गेली आहे. यापैकी ५६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीला २६ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये ससूनमधील १८ व खाजगी हॉस्पिटलमधील ८ रूग्णाचा समावेश आह़े.