पुणे : अँटिजन टेस्टमुळे ससून रुग्णालयाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.अँटिजन टेस्टचा निष्कर्ष १०-१५ मिनिटात कळत असल्याने ससून रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवलेले बेडस् आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वापरासाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांनी दिली. पुण्यात गेल्या दिवसांपासून कोरोनाची अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली. सध्या हे प्रमाण चांगलेच वाढले असून, सध्या पुणे शहर आणि ग्रामीण भागात देखील अँटिजन टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अँटिजन टेस्टचा निष्कर्ष त्वरीत म्हणजे १०-१५ मिनिटांत उपलब्ध होतो.तर रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिएक्शन (rRT-PCR) या टेस्टचे निष्कर्ष येण्यासाठी किमान २४ तास लागत आहेत. यामुळे आतापर्यंत ससून रुग्णालयात कोरोना संशयीत अथवा इतर आजारासाठी दाखल होणाऱ्या पण काही प्रमाणात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ओपीडीतून कोरोना संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात ५० बेडस् च्या वाॅर्डमध्ये पाठवले जात. त्यानंतर अशा सर्व रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले जात. परंतु स्वॅबचा रिपोर्ट येण्यासाठी किमान एक दिवसाचा कालावधी जात होता. यामुळे रिपोर्ट आल्यानंतर संबंधित रुग्णाला कोरोना अथवा अन्य विभागात शिफ्ट केले जात होते. परंतु आता अँटिजन टेस्टचा पर्याय उपलब्ध झाल्याने येणाऱ्या सर्व रुग्णांची अँटिजन टेस्ट करुन पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाला थेट कोरोना विभागात शिफ्ट केले जात असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.------पुण्यात आता पर्यंत ६९ हजार ५७५ अँटिजन टेस्ट गेल्या काही दिवसांत पुण्यात अँटिजन टेस्ट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यात एखाद्या सरकारी अथवा खासगी आस्थापनामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्वरीत अन्य सर्व कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा कल वाढत आहे. यामुळेच आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ६९ हजार ५७५ लोकांनी अँटिजन टेस्ट करुन घेतल्या आहेत. यात सर्वाधिक ४२ हजार १२७ पुणे शहर, २३ हजार पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात ३ हजार ७४५ लोकांनी ही चाचणी केली आहे.
Corona virus : अँटिजन टेस्टमुळे ससून रुग्णालयाचा ताण झाला कमी, पुण्यात आत्तापर्यंत ६९ हजार ५७५ टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:12 AM
संशयित रुग्णांचे ५० बेड कोरोना रुग्णांसाठी झाले रिकामे
ठळक मुद्देपुण्यात गेल्या काही दिवसांपासून अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात