पुणे : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सिमीटर दिसू लागले आहेत. एकाच हाताच्या पाचही बोटांना वेगवेगळे ऑक्सिमीटर लावल्यावर वेगळेवेगळे आकडे दिसत असल्याचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे नेमका कशा प्रकारचा ऑक्सिमीटर वापरावा, याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.
आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फुफुसाला संसर्ग झाल्याने श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळीही खालावते. पल्स ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते. त्याचप्रमाणे प्लसरेट अर्थात आपल्या ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग देखील मिळते. कोरोनाबाधित रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त असले पाहिजे, असे वैद्यकतज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्सिजनची मात्रा ९० पेक्षा खालावल्यास आणि बराच वेळ तशीच राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.
सध्या विविध किमतीचे ऑक्सिमीटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत आहेत. कोणताही ऑक्सिमीटर घेताना कंपनीचा ब्रँड आणि उत्पादनाची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक मानले जाते. सध्या बहुतांश कंपन्यांचे ऑक्सिमिटर चीन, तैवान येथून आयात केले जातात. भारतीय बनावटीच्या ऑक्सीमीटरचे प्रमाण कमी असल्याने चिनी बनावटीचे डिव्हाईस विकण्याशिवाय पर्याय नाही, असे काही औषध विक्रेत्यांनी 'लोकमत' ला सांगितले.
-----
बहुतांश ऑक्सिमिटरचे उत्पादन चीन, तैवान येथे होते. भारतीय बनावटीचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. ग्राहकांकडून ऑक्सिमिटरची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे डिव्हाईस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विश्वासार्ह दुकानदारांकडून खरेदी केल्यास फसवणूक टळू शकते. - महेंद्र तापडिया, औषध व्यापारी
-----
डुप्लिकेट ऑक्सिमिटर उपलब्ध करून दिली जात असल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. ऑक्सिमिटरवरील रिडींग रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे यामध्ये शासनाने हस्तक्षेप करून किमती आणि दर्जा प्रमाणित करायला हवा. ऑक्सिमिटरमध्ये तीव्र सेन्सर बसवलेला असतो. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या उपकरणात अचूक रिडींग घेतले जाऊ शकते. ऑक्सिमिटरमध्ये अंगठ्याच्या बाजूचे किंवा मधल्या बोटाचा वापर करावा.
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य
-----
ऑक्सिमिटरची विश्वासार्हता कशी तपासावी?
- कंपनीचे नाव, यापूर्वीची उत्पादने आणि त्यांचा दर्जा, सध्याचा दर्जा तपासून पहावा
- विश्वासार्ह आणि अधिकृत औषध विक्रेत्यांकडून खरेदी करावी
- रिडींगमध्ये तफावत जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा