नीलेश राऊत-
पुणे : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्या वाटल्या त्याची एक डबी आम्ही केवळ २ रूपयांना घेतली, पण हीच एक डबी राज्य सरकारने तब्बल २३ रूपयांना खरेदी केली, असा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेनेही तोच प्रकार केला आहे.पुणे महापालिकेनेही याच आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्यांची एक डबी प्रारंभी २० रूपयांना तर आता ७ रूपये ९० पैशांना खरेदी केल्याचे समोर आले आहे.
पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत राज्य शासनावर कोरोनाच्या आपत्तीतही भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप केला होता.यावेळी त्यांनी आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळीच्या डबीचे उदाहरण दिले व कोथरूड मतदारसंघातील नागरिकांना वाटप करण्यासाठी आपण हीच एक डबी २ रुपये दराने घेतली असल्याचे सांगितले. परंतु, याच आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिकच्या डब्या पुणे महापालिकेनेही खरेदी केल्या आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयाने ६ मार्चला कोरोनाच्या संसगार्पासून दूर राहाण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्या नागरिकांना देण्याची सूचना केली होती. त्यानुसार देशभरातील बहुतांश राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही या गोळ्यांची खरेदी केली आहे. त्यात पुणे महापालिकेने मे महिन्यांत कोरोना कंटेन्मेंट झोेनमधील नागरिकांसाठी एका संस्थेकडून २० रुपये दराने १४ लाख रुपयांच्या ७० हजार आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या डब्या खरेदी केल्या आहेत.
दरम्यानच्या काळात नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील नागरिकांकडून गोळ्यांची मागणी होऊ लागल्याने, प्रशासनाने पुरवठादारांकडून या औषध खरेदीच्या निविदा मागविल्या. यात प्राप्त ७ निविदांमध्ये सर्वात कमी दर असलेल्या एका मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्सला प्रति डबी ७ रूपये ९० पैसे दर देऊन सुमारे अडीच लाख डब्या खरेदी करण्यात आल्या. या खेरदीपोटी २० लाख रूपये रक्कम अदा करण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे दोन रूपये प्रति डबी खरेदीचा भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा त्यांचीच सत्ता असलेल्या महापालिकेने खोटा ठरविला आहे.
----------------------