पुणे - राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक मत मांडले. पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीवरुन होत असलेल्या टीकेसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. ते आम्ही केले. आम्हालाही अनेकदा वाटतं की आत्ता निवडणुका लागायला नको होत्या. थोड्या उशिरा किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तरी चाललं असतं, असेही अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असणार आहोत. कारण निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत. आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच आहे. निवडणुका लावल्यावर घरातून तर प्रचार होऊ शकत नाही, असे रोखठोक मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच, कडक निर्बंधासंदर्भातही नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
राज्यात यंत्रणा कोलमडून पडलेली आहे. नियमांचे पालन नाही केले तर कोरोना होतो. ॲान-बेड मिळाला नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचल्या. याबद्दलचा प्रयत्न करणं सरकारचं काम आहे. मात्र, सद्य परिस्थितीत तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तरी काही करता येणार नाही, असे पत्रकारांना उद्देशून अजित पवार म्हणाले. तसेच, कोणाचा जीव जावा असं कोणाला वाटतं का? राज्यात शेतकरी आत्महत्या होवू नये म्हणूनही प्रयत्न करत होतो. आता, राज्यात कोरोना बाधितांचे जीव वाचले पाहिजेत. तसेच, कोणी कोरोनाबाधित होवू नये यासाठीचा हा कडक निर्बंध आणि प्रयत्न सुरू असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
विकेंड लॉकडाऊनला म्हणजेच शनिवार आणि रविवारी नागरिकांनी पूर्ण प्रतिसाद दिला, त्याचे अजित पवार यांनी कौतुक केले. मागच्या लॅाकडाउनला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, त्याला प्रतिसाद दिला नाही. तर, संपूर्ण लॅाकडाऊन लावावा लागेल, असा इशारीही अजित पवार यांनी दिला आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा येथील पोटनिवडणुक होत आहे. तिथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. याच, दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ''महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे"अशा शब्दात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, मी राजकीय बोलत नाही. केंद्राने व्हॅक्सीन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टिका करणार असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.
ससूनमधील निवासी डॉक्टरांच्या संपावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ससूनच्या निवासी डॉक्टरांनो सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. तुमचे रास्त मुद्दे नक्की ऐकून घेऊ, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर काही कडक पावलं उचलावी लागतील. ससूनमधील निवासी डॉक्टरांनी परिस्थितीची भान ठेवून टोकाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची मानसिकता ठेवावी. तसेच कोण पक्ष काय म्हणतो याला महत्व नसतं. तर शहराच्या हिताचे काय हे पाहुन निर्णय घेतो असेही पवार म्हणाले.