पुणे : ससून रुग्णालयातील मृत्यूचे सत्र अजूनही सुरूच असून मृतांचा आकडा आता ५० वर जाऊन पोहचला आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीनंतरही रुग्णालय प्रशासनाला मृत्यू रोखता आलेले नाहीत. बदलीनंतर मागील सात दिवसांत कोरोनामुळे १२ जणांना जीव गमवावा लागला आहे.ससून रुग्णालयामध्ये पहिला मृत्यू दि. २ एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर दरदिवशी कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत राहिला आहे. पुढील १४ दिवसांतच तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. काही राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रारही केली. त्यावेळी पुण्यातील मृत्यूदर देशामध्ये सर्वाधिक असल्याचे''लोकमत''ने उजेडात आणले. या घडामोडींनंतर डॉ. चंदनवाले यांची दि. १६ एप्रिलला तडकाफडकी बदली करून त्यांना मुंबईला पाठविण्यात आले. तर अधिष्ठाता पदाचा कार्यभार उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला. विभागीय आयुक्तांनी उपचारासंदर्भात टास्क फोर्स स्थापन केली. पण त्यानंतरही मृत्युचे सत्र थांबलेले नाही.गुरूवारी रात्री उशिरापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याने ससून रुग्णालयातील मृत्यूची संख्या ५० वर पोहचली आहे. केवळ २१ दिवसांत दुपटीहून अधिक मृत्यू झाले आहेत. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी झालेले तिनही मृत्यू विलंबाने आल्याने तसेच अन्य आजार असल्याने झाले आहेत. यापुर्वी झालेल्या मृत्यूमध्येही अनेक रुग्णांना इतर आजार होते. तसेच काही रुग्ण विलंबाने रुग्णालयात दाखल झाले होते, असे यापुवीर्ही स्पष्ट करण्यात आले आहे.--------------
Corona virus : ससूनमधील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; आकडा आता ५० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 4:14 PM
तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या बदलीनंतरही रुग्णालय प्रशासनाला मृत्यू रोखता आलेले नाहीत...
ठळक मुद्देकेवळ २१ दिवसांत दुपटीहून अधिक मृत्यू