Corona virus : बालेवाडी क्वारंटाईन सेंटरमधील २५ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:52 PM2020-04-24T15:52:39+5:302020-04-24T15:53:11+5:30
बालेवाडी गावात २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़.
पुणे : बालेवाडी गावात २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे़. तो अत्यंत चुकीचा असून, या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी एकही रूग्ण बाणेर-बालेवाडी येथील भागातील नागरिक नाही. तर बालेवाडी येथे पालिकेने सुरू केलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील आहे.
शहरी भागातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणच्या ज्या व्यक्तींना सौम्य लक्षणे आढळून आली, अशा साडेतीनशे व्यक्तींना बालेवाडी येथील निकमार कॉलेजमध्ये क्वारंटाईन (विलगीकरण कक्षात ) सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांची तपासणी करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी ३३ जणांचे अहावाल हे पॉझिटिव्ह आले असून, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांचे तपासणीचे अहवाल सध्या प्राप्त होत असून, जसे अहवाल प्राप्त होतील तसे त्यांना पालिकेच्या पॅनेलवरील अन्य खाजगी रूग्णालयात कोव्हिड-१९ च्या उपचारासाठी हलविण्याचे काम सध्या सुरू आहे.
पुणे महापािलकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील दाटवस्ती भागात सर्वेक्षणाचे काम सुरू असून यामध्ये सौम्य लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना निकमान कॉलेजच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आले आहे. या सर्वांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, जस-जसे अहवाल प्राप्त होत आहे. तसे पॉझिटिव्ह रूग्णांना अन्यत्र हलविण्यात येत आहे.
जे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत ते या क्वारंटाईन सेंटरमधीलच आहे. बाणेर-बालेवाडी अथवा परिसरातील एकही व्यक्ती यामध्ये नाही़ त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. निकमार कॉलेज येथे २२ एप्रिल पासून शहरातील दाटवस्ती भागातील कोरोना संशयित रूग्णांना दाखल करण्यात येत असून, त्यांच्या तपासणीचे काम चालू आहे़ प्रशासनाने या भागात अन्य नागरिकांना प्रवेश बंद केला आहे.
ज्या भागात कोरोनाचा संसर्ग नाही तेथे कोरोनाबाधित रूग्ण ठेवण्याची गरज काय ?
पुणे शहरात एकीकडे चार पेक्षा अधिक वार्डांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे बाणेर-औध या भागात कोरोनाचा एक रूग्ण महिनाभरापूर्वी आढळून आला आसताना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही़. त्यामुळे ज्या भागात कोरोनाचा एकही रूग्ण किंवा संशयितही नाही त्या भागात कोरोना बाधितांच्या किंवा संशयितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणे चुकीचे आहे अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत़
औंध-बाणेर व कोथरूड- बावधान या दोन्ही वार्डात विशेषत: बालेवाडी भागात आत्तापर्यंत फिजिकल डिस्टसिंग पाळले गेले़ तसेच येथील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालनही मोठ्या प्रमाणात केल्याने, या भागात कोरोनाचा एकही रूग्ण सापडला असताना त्याचा इतरांना संसर्ग झाला नाही.अशा बालेवाडीत निकमार कॉलेजमध्ये कोरोनाबाधितांना आणून कोरोनाचा संसर्ग या भागात वाढण्याची दाट शक्यता आहे. जो भाग शासनाच्या निकषाप्रमाणे ग्रीन झोन आहे. तेथे इतर भागातील रूग्ण ठेऊन तो भितीच्या छायेखाली ठेवणे योग्य नाही. कोरोनाबाधितांना योग्य उपचार मिळावे, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा ही सर्वांचीच भूमिका आहे. परंतू, विनाकारण संसर्ग नसलेल्या भागाला विशेषत: बालेवाडी गावाला वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे हे क्वारंटाईन सेंटर या ठिकाणाहून हलवावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.