Corona virus : स्वयंशिस्तीच्या अभावामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर रूग्णांची वाढली टक्केवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:08 AM2020-07-21T01:08:01+5:302020-07-21T01:08:23+5:30
क्षेत्राबाहेर सूट दिल्यानंतर नागरिक स्वयंशिस्तीचे पालन करण्याऐवजी निर्धास्त राहत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे
पुणे : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला अटकाव करण्यासाठी शहरात प्रतिबंधित झोनची आखणी करून पालिकेने पोलिसांच्या मदतीने त्याची कडक अंमलबजावणी केली. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर रुग्ण कमी असल्याने येथील नागरिकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. परंतु, स्वयंशिस्तीच्या अभावामुळे १ मेच्या तुलनेत जुलैमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे.
पालिकेकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, ३ मे रोजी शहरात ६९ प्रतिबंधित क्षेत्र होते. या क्षेत्रांत शहरातील एकूण रुग्णसंख्येच्या ७४.६ टक्के रुग्ण होते. तर, क्षेत्राबाहेर २५.४ टक्के रुग्ण होते. परंतु, १ जुलैच्या आकडेवारीनुसार प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ४०.२ टक्के तर क्षेत्राबाहेर ५९.८ रुग्ण असल्याचे आकडेवारी सांगते. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने कोविड सेंटर्स उभे करण्यासोबतच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या तपासणीवर भर देण्यात आला होता.
भवानी पेठ, नाना पेठ, मंगळवार पेठ, ताडीवाला रोडसह शहरातील दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टीबहुल भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले होते. त्याकरिता रुग्णसंख्या अधिक असलेल्या शहरात प्रतिबंधित क्षेत्र करून तेथे कडक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. येथील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली होती. पालिकेने या भागांमध्ये ७० हजार रेशन किटचे वाटपही केले. पालिकेने आतापर्यंत वेळोवेळी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून आलेल्या निर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात बदल केले आहेत. प्रत्येक आठवड्याला रुग्णसंख्येचा आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्राची आखणी करण्यात येते. प्रतिबंधित भागाचे क्षेत्रही कमी करण्यात आले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यानंतर काहीप्रमाणात नागरिक निर्धास्त होत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या कमी होत असतानाच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मात्र रुग्ण संख्या वाढू लागल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सूट दिल्यानंतर नागरिक स्वयंशिस्तीचे पालन करण्याऐवजी निर्धास्त राहत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. नियमांचे पालन न करणे, लोकांचे एकमेकांमध्ये मिसळणे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर न राखणे या कारणांमुळे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर रुग्णसंख्या वाढू लागल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
------------
प्रतिबंधित क्षेत्राच्या आतील आणि बाहेरील वाढलेल्या रूग्णांची टक्केवारी तारीख प्रतिबंधित क्षेत्र क्षेत्रफळ आतील रुग्ण बाहेरील रुग्ण ०३ मे ६९ ९.९१ चौरस किलोमीटर ७४.६% २५.४% १८ मे ६५ १०.४६ चौरस किलोमीटर ५५.९% ४४.१% ०१ जून ६६ ९.२८ चौरस किलोमीटर ३६.८% ६३.८% १७ जून ७३ ६.६४ चौरस किलोमीटर ३७.८% ६२.२% ०१ जुलै १०९ ६.६९ चौरस किलोमीटर ४०.२ ५९.८%
------------
रुग्णसंख्या वाढण्याची प्रमुख कारणे
* नियमांचे काटेकोर पालन न करणे.
* प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लोकांचे आतमध्ये जाणे.
* प्रतिबंधित क्षेत्राच्या आतील लोकांचे बाहेर जाणे.
* एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे.
* लोकांचे एकमेकांमध्ये मिसळणे.