Corona virus : पुण्यातील जम्बो हॉस्पिटल पंधरा दिवसात पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल : विक्रम कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:31 PM2020-09-18T12:31:25+5:302020-09-18T12:36:05+5:30
शहरातील अन्य हॉस्पिटलमधील बेडही ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू
पुणे : जम्बो हॉस्पिटल ४०० बेडच्या क्षमतेने कार्यरत ठेवण्यासाठी पीएमआरडीएकडून सध्या वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. शुक्रवारी या हॉस्पिटलमध्ये आणखी ४०० बेड नव्याने सुरू करण्यासाठी नव्याने वर्क ऑर्डर काढण्यात येणार असून येत्या आठ दिवसांत ते उपलब्ध होतील. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
जम्बो हॉस्पिटलकरिता लागणाऱ्या मनुष्यबळाचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, त्यासाठी ससूनमधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. जम्बो हॉस्पिटलची क्षमता वाढवितानाच, बाणेर येथील कोविड हॉस्पिटलही सोमवारपासून पूर्ण क्षमतेने म्हणजे ३१४ बेडसह सुरू होणार आहे़ आजमितीला येथे १८० बेड असून, १२० रूग्ण येथे उपचार घेत आहेत. तसेच शहरातील अन्य हॉस्पिटलमधील बेडही ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
------------
महापालिकेडून स्वत:ची लॅब उभारण्याचा प्रयत्न
पुणे महापालिकेकडून स्वत:ची टेस्टिंग लॅब तयार करून टेस्टिंग मशीन खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. ही लॅब सुरू झाल्यावर जास्तीत जास्त स्वॅब टेस्टिंग करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल असा विश्वास विक्रम कुमार यांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिकेने स्वत:ची टेस्टिंग लॅब तयार करावी अशी मागणी सातत्याने नगरसेवकांकडून होत आहे.आजमितीला दररोज पाच ते सहा हजार नागरिकांची स्वॅब सॅम्पल्स घेतले जात आहेत. पण तया तुलनेत लागलीच टेस्टिंगचे अहवाल येत नाहीत. सध्या शहरात तीन ठिकाणी टेस्ट तपासणी केल्या जात असल्या तरी त्याला मर्यादा आहेत. तसेच याठिकाणी अन्य जिल्ह्यातूनही स्वॅब टेस्टिंगसाठी येत असल्याने, महापालिकेची स्वत:ची लॅब असणे फायदेशीर ठरणार आहे़ त्यामुळे या विषयावर स्थायी समिती, महापौर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले.
----------------
गटनेत्यांच्या सूचनांवर कार्यवाही करू
शहरी गरीब योजनेचा निधी हा शहरातील सर्व नागरिकांचा प्रत्येकी दोन लाखांचा ९ महिन्यांकरिता आरोग्य विमा काढण्यासाठी खर्च करावा, अशी सूचना पक्षनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे. ही सूचना प्रत्यक्षात अंमलात येऊ शकते का याची तपासणी करून त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले.