पुणे : कोरोनाचे थैमान सुरू असणाऱ्या पुण्यामध्ये शनिवारी ( दि. ६) अनेक महिन्यांनंतर कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये. रुग्णांची संख्या कमी होत असतानाच पुणेकरांसाठी ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र असतानाच, शहरासाठी शनिवारी ( दि.६ ) दिवस सुखद वार्ता देणारा ठरला. ३० मार्च २०२० नंतर प्रथमच पुणे शहरात आजचा दिवशी कोणाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याची घटना घडली आहे.
पुणे शहरात गेल्या दहा महिन्यात ३० च्या पुढे गेलेले रोजच्या कोरोनाबाधितांचे मृत्यू दिवाळीनंतर १० च्या आत आले आहेत. तर शहरातील सक्रिय रुग्ण संख्या दीड हजारापर्यंत व गंभीर रुग्ण संख्या ही १०० च्या आसपास आजमितीला आली आहे. अशातच गेल्या दहा महिन्यात शनिवारी प्रथमच एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाली नसल्याची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोना संसर्ग देशात वेगाने पसरू लागल्यावर, पुण्यात ९ मार्च, २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला. आला. त्यानंतर सातत्याने बाधितांची संख्या वाढत गेली. व ३० मार्च, २०२० रोजी पहिला कोरोनाबाधिताचा बाली पुणे शहरात गेला. कोरोना संसर्ग वाढत राहिल्याने शहरात पुण्याबाहेरील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येऊ लागले. एप्रिल, २०२० च्या पहिले ७/८ दिवस वगळता आजपर्यंत दररोज शहरात कोरोनाबाधितांचा मृत्यू होत गेला.
शहरात कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूपैकी केवळ कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू कमी असले तरी, इतर आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांची नोंद आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू म्हणूनच घेतली गेली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील घरा घरात पोहचून अन्य व्याधी ग्रस्त व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती यांची नोंद घेतली व त्यांना वेळीच औषधे उपलब्ध करून दिली. याचा फायदा कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावर झाला. परिणामी आज शहरात केवळ १ हजार ४०७ सक्रिय रुग्ण असून, यापैकी ९० टक्के हे लक्षणे विरहीत आहेत. तर यातील ६० टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडसाठी एकावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना विविध हॉस्पिटल चे उंबरठे झिजवावे लागले होते. पण आज याच पुण्यात ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या केवळ २१२ असून, व्हेंटिलेटरवर १२ रुग्ण आहेत. -----------
महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ऑक्टोबरपासून एकूण मृत्यूंची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यामुळे ती संख्या कमी झाली होती. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली होती याचाच परिणाम म्हणून आज तब्बल नऊ साडे नऊ यानंतर एकही मृत्यू झालेला नाही.
.............
कोरोना विरोधातील लढ्याला मोठे यश : महापौर
कोरोनाविरुद्ध लढा अजूनही सुरू असला तरी, आज या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. ३० मार्चनंतर एप्रिल, २०२० च्या महिन्यातील पहिले पंधरा दिवस वगळता आजपर्यंत एकही दिवस कोरोनामुळे मृत्यू झाला असा एकही दिवस गेला नाही.पण आज ( दि.६) दहा महिन्यानंतर प्रथमच पुणे शहरात कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाला नाही. कोरोना विरुध्द च्या लढ्यात अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य सेवकांसह, कोरोना आपत्तीत सहकार्य करणाऱ्या सर्व पुणेकरांचे या यशात मोठे योगदान आहे. अशा भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केल्या.