Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना 'पॉझिटिव्हिटी रेट' अजूनही चिंताजनकच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 11:59 AM2020-10-09T11:59:08+5:302020-10-09T11:59:36+5:30
ऑक्टोबर महिन्यात शहरामध्ये दररोज सरासरी केवळ ३८०० चाचण्या होत आहेत. तर नवीन रुग्ण ७२५ च्या जवळपास आहेत.
पुणे : मागील काही दिवसांत शहरातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी झाला. त्यातुलनेत दैनंदिन चाचण्याही कमी झाल्या आहेत. पण पॉझिटिव्हिटी रेट अजूनही चिंताजनकच असल्याचे आकडेवारीवरून दिसते. सध्या शहरात एकुण चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) जवळपास २३ टक्के आहे. तर रुग्ण कमी आढळूनही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सात दिवसांतील हे प्रमाण १९ टक्के एवढे आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही तुलनेने तेवढे कमी झालेले नाही.
ऑक्टोबर महिन्यात शहरामध्ये दररोज सरासरी केवळ ३८०० चाचण्या होत आहेत. तर नवीन रुग्ण ७२५ च्या जवळपास आहेत. मागील महिन्यांत हे प्रमाण उलट होते. दररोज जवळपास साडे पाच हजारांहून अधिक चाचण्या होत होत्या. तर रुग्णही १६०० हून अधिक होते. याच महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या. तसेच दैनंदिन नवीन रुग्ण व मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक राहिले. विशेष म्हणजे पॉझिटीव्हिटी रेट २८ टक्क्यांच्या पुढे गेला होता. म्हणजे १०० जणांपैकी २८ ते २९ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होत होते.
मागील काही दिवसांत रुग्ण कमी दिसत असले तरी चाचण्यांचे प्रमाणही तुलनेने कमी झालेले आहे. या आठ दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट १९ टक्क्यांच्या पुढे तर मृत्यूदर ४ टक्क्यांच्या पुढे आहे. जून महिन्यांत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते. जुलै महिन्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर पोहचला. सप्टेंबरमध्ये तर हे प्रमाण उच्चांकी ठरले. पण ऑक्टोबरमध्ये चाचण्या कमी झाल्याने पुन्हा हा दर २० टक्क्यांच्या खाली आला आहे. चाचण्या कमी करून कमी झालेला दर आश्वासक नसतो. अधिकाधिक चाचण्या वाढवून जर दर कमी होत असले तर ते दिलासादायक म्हणावे लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-----------------------
मागील काही महिन्यांतील चाचण्या, नवीन रुग्ण व मृत्यूची दैनंदिन सरासरी
महिना चाचण्या नवीन रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यू
ऑक्टोबर (१ ते ७) ३७९९ ७२२ १९.०१ २९
सप्टेंबर ५६५१ १६०७ २८.४४ ३८
ऑगस्ट ५५४१ १२७७ २३.०५ ३१
जुलै ४९४६ ११६६ २३.५७ २१
जुन २११७ ३४७ १६.४२ १०
मे १२२१ १७० १३.९९ ७
----------------------------------------------------------
सद्यस्थितीत मागील महिन्याप्रमाणेच चाचण्यांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. चाचण्या कमी करण्याइतपत आपली स्थिती सुधारलेली नाही. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी तो आणखी नियंत्रणात आणायचा असल्यास चाचण्या वााढविण्याशिवाय पर्याय नाही. पॉझिटिव्हिटी रेट किमान ५ ते १० टक्क्यांपर्यंत आल्यानंतरच तसा विचार केला जाऊ शकतो.
- डॉ. भालचंद्र पुजारी, शास्त्रज्ञ, इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टु कोविड
-------------------