Corona virus : पुणे शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण अजूनही शेकड्यातच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:40 PM2020-05-05T23:40:00+5:302020-05-05T23:40:02+5:30
हॉटस्पॉट मधील संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची अपेक्षा व्यक्त
राजानंद मोरे
पुणे : अतिसंक्रमित (हॉटस्पॉट) भागात चाचण्या वाढविण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी हे प्रमाण अजूनही शेकड्यातच आहे. मागील आठ दिवसांत तपासणीसाठी पाठविण्यात येणाऱ्या नमुन्यांची दैनंदिन सरासरी केवळ ६५० च्या जवळपास आहे. तर त्यापैकी दररोज सरासरी ९२ नवीन रुग्ण बाधित असल्याचे समोर येत असून हे प्रमाण १४ टक्के एवढे आहे. चाचण्या वाढल्या की रुग्णसंख्या वाढत असल्याचे मागील काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे हॉटस्पॉट मधील संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील भवानी पेठ, गंज पेठ, पर्वती दर्शन, पाटील इस्टेट, मार्केटयार्ड यांसह अन्य काही भागातील झोपडपट्टी तसेच दाटीवाटीने घरे असलेल्या भागामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा भागच हॉटस्पॉट म्हणून निश्चित करण्यात आला असून तिथे तपासणी तसेच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णांचा आकडाही वाढल्याचे स्पष्टपणे दिसते. दि १५ एप्रिलपर्यंत शहरातील चाचणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने ३५५८ एवढे होते. त्यापैकी ३७७ म्हणजे १०.५९ टक्के जणांना लागण झाल्याचे समोर येत होते. म्हणजे प्रत्येक १०० व्यक्तीमागे १० जण बाधित होते. आकडेवारीनुसार, दि. २७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत शहरात ५ हजार २१७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ८११ म्हणजे जवळपास १५ टक्के लोकांना लागणी झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ सध्या प्रत्येक १०० लोकांमागे १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसते.
मागील आठ दिवसांची सरासरी काढल्यास नमुने तपासणीसाठी पाठविण्याची दैनंदिन सरासरी केवळ ६५० च्या जवळपास आहे. तर त्यापैकी दररोज सरासरी ९२ नवीन रुग्ण बाधित असल्याचे दिसते. हे प्रमाण तर १४ टक्के एवढे आहे. या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येते की चाचण्यांचे प्रमाण वाढविल्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे. हॉटस्पॉट भागामध्ये संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला असल्याने तेथील चाचण्याही वाढविण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र, सध्या हे प्रमाण दररोज सरासरी ६५० च्या जवळपास आहे. या भागात काही लाख लोक राहत असताना चाचण्या मात्र तुलनेने खुप असल्याचे चित्र आहे. चाचण्या वाढवून बाधित लोकांना लगेच विलग करणे आवश्यक आहे. अन्यथा संसर्ग वाढत जाण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेनेही व्यक्त केला आहे.
---------------------
मागील काही दिवसांत महापालिका क्षेत्रात तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने व नवीन रुग्ण (स्त्रोत - महापालिका आरोग्य विभाग)
दिवस पाठविण्यात आलेले नमुने नवीन रुग्ण
२७ एप्रिल ४६२ ७८
२८ एप्रिल ६६८ १२२
२९ एप्रिल ६०२ ९३
३० एप्रिल ७८० ८६
१ मे ६९१ ९३
२ मे ५७८ १०७
३ मे ५५७ ९९
४ मे ८७९ ६१
एकुण ५,२१७ ८११
----------------------------
शहर व जिल्ह्याची स्थिती (दि. ४ मे पर्यंत)
जिल्हा - तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने - १७,२७२
एकुण बाधित - २,१२२
बाधितांची टक्केवारी - १२.२८
पुणे शहर नमुने -१३,०८६
बाधित - १,८७६
बाधितांची टक्केवारी - १४.३३
(स्त्रोत - जिल्हा आरोग्य अधिकारी)
---------------------------
चाचण्या वाढण्याची गरज
झोपडपट्टी भागामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग कठीण असल्याने मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील चाचण्यांचा वेग वाढवायला हवा. केवळ बाधितांच्या थेट संपकार्तील लोक किंवा लक्षणे असलेल्या लोकांच्या चाचण्या न करता परिसरातील अनेकांच्या चाचण्या व्हायला हव्यात. अनेकांना लक्षणे दिसत नसल्याने या लोकांकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे हॉटस्पॉटमधील सगळ््यांचीच चाचणी करायला हवी.
- डॉ. विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिम्बायोसिस हॉस्पीटल
-----------
प्रोटोकॉल - चाचणी कोणाची घ्यायची?
- लक्षणे असलेली व्यक्ती
- बाधित व्यक्तीचे थेट संपर्क
चाचणी कोणाची घ्यायची नाही?
- बाधित व्यक्तीच्या थेट संपर्क न आलेली व्यक्ती
- लक्षणे नसलेली व्यक्ती
---------------------------
सध्या चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. लक्षणे असलेल्या प्रत्येकाची चाचणी घेतली जात आहे. तसेच बाधित व्यक्तीच्या संपकार्तील प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. लक्षणे नसलेली किंवा बाधित व्यक्तीच्या संपकार्तील व्यक्तीची चाचणी घेतली जात नाही.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
-------------