पुणे : पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) रेड झोनमधील नागरिकांची तपासणी युध्दपातळीवर सुरू असल्याने, आत्तापर्यंत लक्षणे दिसून न आलेले पण कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक व्यक्ती उजेडात येऊ लागल्या आहेत. गुरूवारी आजपर्यंत एकाच दिवसात प्रथमच शंभरपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तब्बल १०४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८७६ झाला आहे. दरम्यान आज चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ससूनमधील ५० वर्षीय महिलेचा व ४७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर लष्कराच्या रूग्णालयात एका ८४ वर्षीय पुरूषाचा तर बुधराणी हॉस्पिटलमधील ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रूग्णांमध्ये आज ८ ने वाढ झाली असून, आजपर्यंत शहरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३० झाली आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नायडू हॉस्पिटलमधील १, सिम्बॉयसिस हॉस्पिटलमधील ५ व भारती हॉस्पिटलमधील २ जणांचा समावेश आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका हद्दीत गुरूवारी सायंकाळी सातपर्यंत नव्याने आढळून आलेल्या सर्व रूग्णांपैकी नायडू हॉस्पिटल व अन्य कोविड केअर सेंटरमध्ये ६६७ रूग्ण आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी ३६ रूग्णांची प्रकृती गंभीर असून, यापैकी २५ रूग्ण हे ससूनमधील आहेत.
Corona virus : पुण्यात गुरूवारी एकाच दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:07 PM
कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रूग्णांमध्ये आज ८ ने वाढ
ठळक मुद्देपुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७६ : आत्तापर्यंत ६० जणांचा मृत्यू