पुणे : ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी दर तसेच हॉटस्पॉट गावांची संख्या एकीकडे आटोक्यात येत नसताना जवळपास ११०७ गावे काेरोनामुक्त झाल्याचे दिलासादायक चित्र पुढे आले आहे. दोन्ही लाटेत ५५४ गावांत कोरोनाबाधित होते. या गावांत आज एकही कोरोनाबाधित नाही. त्यात गेल्या १५ दिवसांपासून ६०७ गावांत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे आजच्या घडीला ११०७ गावे कोरोनामुक्त झाली आहे. ३१ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळवले आहे. आजच्या घडीला १९४ गावांत सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
कोरोना विषाणूमुळे गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरापर्यंत मर्यादित असलेले कोरोनाबाधित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील सर्व तालुके कोरोनामुळे बाधित झाले. जिल्हा परिषदेमार्फत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण, माझे कटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण, घरोघरी जाऊन सर्वेक्षण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. जिल्ह्यात १४०८ ग्रामपंचायती आहेत. यातील १९४ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ५४४ गावे कोरोनाबाधित झाली होती. या गावांत आजच्या घडीला एकही कोरोनाबाधित नसल्याने ही गावे कोरोनामुक्त झाली आहे. त्यात ६०७ गावांची भर पडली आहे. या गावात गेल्या १५ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळत होते. ग्रामीण भागाचा बाधित दरही १० च्या पुढे होता. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे हा दर आता ५.६ टक्क्यांवर आला आहे. खेड तालुक्यातील ९६ कोरोनामुक्त झाली आहे. त्यापाठोपाठ भोर तालुक्यातील ७०, हवेलीतील ६०, वेल्हेतील ५९, मुळशी तालुक्यातील ६९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. आरोग्य विभाग, गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांमार्फत कोरोनामुक्तीसाठी जिल्ह्यात सध्या धडक सर्वेक्षण सुरू आहे. याचाही फायदा झाला असून अनेक गावांत कोरोनाबाधितांची संख्या ही घटली आहे. येत्या काळातही धडक सर्वेक्षण मोहीम सुरू राहणार असून, त्या माध्यमातून कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची अॅन्टीजन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
वेशीवरच रोखले कोरोनाला
ग्रामीण भागातील ३१ गावांनी कोरोनाला दोन्ही लाटेत वेशीवरच थोपवून धरले. या गावातील एकही रूग्ण कोरोनाबाधित झालेला नाही. त्यामुळे आजही ही गावे कोरोनामुक्त राहिली आहे. यासाठी विविध योजना गावपातळीवर राबविण्यात आल्या होत्या. खेड तालुक्यातील १५ गावे, वेल्हे तालुक्यातील ८ गावे, भोरमधील ३ गावे, मुळशीमधील ३ गावे, आंबेगाव, पुरंदरमधील प्रत्येकी १ गाव असे ३१ गावांनी कोरोनाला गावाबाहेर रोखले आहे.
धडक सर्वेक्षणामुळे कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. आजच्या घडीला गेल्या १५ दिवसांपासून ६०७ गावांत एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही. यापूर्वी ५५४ गावे ही कोरोनामुक्त झालेली आहेत. काही गावांत रुग्ण वाढत असले तरी त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
तालुका दोन्ही लाटेमध्ये रुग्ण असलेली व आता मुक्त झालेली १५ दिवसांपासून ० केसेस असलेली गावे
आंबेगाव ३४ ४८
बारामती २८ २३
भोर ७० ३
दौंड १८ ८
हवेली ४९ ६०
इंदापूर ४३ ९६
जुन्नर २१ ४०
खेड ७४ ९६
मावळ ५७ ५४
मुळशी ३३ ५९
पुरंदर ५२ ४६
शिरूर १६ १६
वेल्हे ५९ ५९
एकूण ५५४ ६०७