Corona virus : 'होम आयसोलेशन'मधील रूग्णांसाठी ‘टेलिमेडिसीन’,अॅप्लिकेशन विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:34 PM2020-07-03T14:34:41+5:302020-07-03T14:36:27+5:30
पुणे महापालिका हद्दीतील ५०० रुग्णांना आतापर्यंत 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले आहे...
प्रज्ञा केळकर-सिंग -
पुणे : पुणे महापालिका हद्दीत आतापर्यंत सौम्य लक्षणे असणाऱ्या ५०० पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. होम क्वारंटाईन आणि होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आता टेलिमेडिसीन अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये रुग्णांना डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. आयएमच्या सहा डॉक्टरांशीही रुग्णांना आॅन कॉल संवाद साधता येत आहे. तसा प्रस्ताव आयएमएतर्फे आरोग्य विभागाला दिला आहे.
केंद्र सरकारकडून 'होम क्वारंटाईन' आणि 'होम आयसोलेशन' चे नियम बदलले आहेत. त्यानुसार घरी वेगळी खोली, स्वतंत्र बाथरूम आणि काळजी घेणारी व्यक्ती असल्यास रुग्णांना घरीच अलगीकरण होण्यास परवानगी दिली आहे.
होम आयसोलेशन'मधील रुग्णाने , केअर टेकरने काय काळजी घ्यावी याचे सविस्तर नियम सांगणारे माहितीपत्रक दिले आहे. याशिवाय, आपत्कालीन व्यवस्थापन सेलअंतर्गत डॉक्टरांची टीम तैनात केली आहे. डॉक्टरांचे संपर्क क्रमांक, त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचे संपर्क रुग्णांना दिले आहेत. याशिवाय, १०४ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हेल्थ इन्फरमेशन मॅनेजमेंट सिस्टिम सुरू झाली आहे. यासाठी एका खाजगी एजन्सीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
-----
टेलिमेडिसीन अॅप्लिकेशन लवकरच होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईनमधील रुग्णांना उपलब्ध होईल. हे अँप डाऊनलोड करून डॉक्टरांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता येईल. याशिवाय, अमेरिकेतील एका एजन्सीशी करार करून कॉल सेंटर सुरू होत आहे. त्यामध्ये ४० डॉक्टरांची टीम २४़ ७ रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असेल. स्लम एरिया वगळता सर्व भागांमधील अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना 'होम आयसोलेशन' करत आहोत.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महापालिका
------
सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांना 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले जात आहे. पुणे महापालिका हद्दीतील ५०० रुग्णांना आतापर्यंत 'होम आयसोलेशन'मध्ये ठेवले आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य विभाग प्रमुख
-----
होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी सुविधा
- रुग्णाने, केअर टेकरने काय काळजी घ्यावी याचे माहितीपत्रक
- टेलिमेडिसीन अॅप्लिकेशन विकसित
- आयएमच्या डॉक्टरांशी संवाद
- १०४ टोल फ्री क्रमांक
- अमेरिकेतील एजन्सीशी करार करून ४० डॉक्टरांची टीम असलेले कॉल सेंटर