Corona virus : कोरोना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जायचंय, पन्नास हजारांची तयारी ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:57 PM2020-07-03T14:57:55+5:302020-07-03T15:04:35+5:30
एका रुग्णालयाने विमा नसल्यास तब्बल एक लाख रुपये आणि विमा असल्यास ५० हजार डिपॉझिट भरावे लागेल असे सांगितले...
नम्रता फडणीस / राजानंद मोरे
पुणे : तुम्हाला कोरोनाची लक्षणे असतील आणि शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये जायचे असेल तर आधी ३० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट भरावे लागत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. तर काही रुग्णालये रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच खर्चाबाबत माहिती देऊ, असे सांगत असल्याचे स्पष्ट झाले.
महापालिकेने काही खासगी रुग्णालयांशी करार केले आहेत. या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिका यंत्रणेतून या राखीव खाटांवर दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. त्याचा खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून संबंधित रुग्णालयांना दिला जातो. या रुग्णालयांमध्ये महापालिका यंत्रणेव्यतिरिक्त कोरोना रुग्णांसाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यासाठीचे दर संबंधित रुग्णालयांनी निश्चित केले आहेत. या दरांबाबत अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानंतर राज्य शासनाने या दरांवर नियंत्रण आणून जनरल आयसोलेशन वॉर्ड व अतिदक्षता विभागाचे कमाल दर निश्चित केले. या दरांमध्ये कोणत्या बाबी अंतर्भुत आहेत दि. २१ मे रोजीच्या आदेशात देण्यात आली आहे. त्यामध्ये इतर तपासण्या व शस्त्रक्रियेचे दरही देण्यात आले आहेत. त्यानुसार दर आकारणी करावी, असे आदेशात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे.
-----------------
कोरोना संशयित रुग्णाला दाखल करायचे आहे, यासाठी 'लोकमत' प्रतिनिधींनी शहरातील काही बड्या रुग्णालयांमध्ये दुरध्वनीवर संपर्क साधला. एका रुग्णालयाने विमा नसल्यास तब्बल एक लाख रुपये आणि विमा असल्यास ५० हजार डिपॉझिट भरावे लागेल असे सांगितले. तसेच जनरल आयसोलेशन वॉर्डचे केवळ बेडचे प्रतिदिन दर चार हजार रुपये सांगण्यात आला. हा दर केवळ बेडसाठी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दुसऱ्या रुग्णालयामध्ये जनरल वॉडसाठी ३० हजार आणि आयसीयुसाठी ५० हजार रुपये डिपॉझिट सांगितले. तर आयसोलेशन बेडचे दर आयसीयुसाठी ४ हजार रुपये आणि जनरल वॉर्डसाठी २ हजार रुपये सांगण्यात आले. या दरांमध्येही अन्य कोणत्याही उपचार किंवा इतर तपासण्यांचा अंतर्भाव नसल्याचे बिलिंग विभागातून सांगण्यात आले. तिसऱ्या रुग्णालयामध्ये जनरल आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन हजार रुपये प्रतिदिन बेड चार्जेस सांगण्यात आले. डिपॉझिटबाबत त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही. चौथ्या रुग्णालयामध्ये बेड चार्जेसची माहिती देण्यासही नकार देण्यात आला. रुग्ण दाखल करताना ही माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.
-------------
राज्य शासनाच्या आदेशानुसार, निश्चित केलेल्या दरामध्ये बेड चार्जेस व नर्सिंग चार्जेससह रुग्णाची देखभाल, सीबीसी, युरिन, रुटीन, एक्स रे, २ डी इको आदी तपासण्यांचाही समावेश आहे. मात्र, एका रुग्णालयांकडून दिलेल्या माहितीनुसार, जनरल वॉर्डसाठीच्या प्रतिदिन चार हजारांच्या दरामध्ये या तपासण्या अंतर्भुत नसल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व तपासण्यांचा समावेश नसल्याचे सांगण्यात आले.
राज्य शासनाने निश्चित केलेले दर
जनरल आयसोलेशन वॉर्ड - ४ हजार रुपये
आयसीयु - ७५०० रुपये
आयसीयु (व्हेंटीलेटरसह ९००० रुपये)
--------------
कोरोना रुग्णांच्या संदर्भात तक्रारी धमार्दाय आयुक्त कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. काही रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुरू आहेत. इतर खासगी रुग्णालयांकडून अवाजवी उपचार खर्च घेतला जात असेल तर धमार्दाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.
- नवनाथ जगताप, सह धमार्दाय आयुक्त, पुणे विभाग
--------------