कोरोनाने थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूकांंना मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:59+5:302021-02-10T04:12:59+5:30
पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे थांबलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहुर्त मिळाला आहे. ४४ हजार ६१३ संस्थांच्या निवडणुकांसाठी ...
पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे थांबलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहुर्त मिळाला आहे. ४४ हजार ६१३ संस्थांच्या निवडणुकांसाठी चार टप्प्यांच्या आराखडा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.
प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावामुळे संचालक मंडळांची मुदत संपल्यानंतरही त्यांना मुदतवाढ देत सहकारी संस्थांची निवडणूक थांबवली होती. १८ मार्च २०२० पासून थांबवलेल्या या निवडणुका घेण्यास अखेर सरकारने २ फेब्रुवारीला मान्यता दिली. त्यामुळे प्राधिकरणाने त्याची पुर्वतयारी सुरू करून एक आराखडा तयार केला आहे.
यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया सुरु झालेल्या परंतु कोविडमुळे प्रक्रिया थांबविलेल्या ३ हजार २१३ संस्थाची निवडणुक प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होईल. दुसºया टप्प्यात १२ हजार ५०८ संस्थाच्या निवडणुका ३० एप्रिल २०२१ पर्यंत होतील. १४ हजार ३०१ संस्थांची निवडणूक ३१ मे २०२१ पर्यंत पुर्ण होतील. अखेरच्या टप्प्यातील १४ हजार ५९१ संस्थांच्या निवडणुका ३० जून २०२१ अखेर पूर्ण होतील. या निवडणुकांचा कार्यक्रम प्राधिकरणाच्या वतीने स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील असे डॉ. पाटील यांनी सांगितले.