----------
- शरद पांडुरंग काळे
sharadkale@gmail.com
आवळ्याचे झाड ७-८ मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. गावठी आणि सुधारित वाणांची झाडे भारतात अनेक ठिकाणी आढळतात. Phyllanthus emblica असे शास्त्रीय नाव असलेली ही वनस्पती Phyllanthaceae या कुटुंबातील आहे. Indian gooseberry, आमलकी (संस्कृत), आवळा आणि मलाक्का या विविध नावांनी ही वनस्पती ओळखली जाते. गावठी आवळे काचेचा गोटीसारखे लहान असतात तर लागवडीखाली सुधारित वाणांच्या झाडांना टपोरे किंवा १.५ ते २ से. मी. व्यासाची फळे येतात. ऑक्टोबर- नोव्हेंबर हा आवळ्याचा मोसम म्हणता येईल. आवळ्याची चव आंबट कमी आणि तुरट जास्त अशी असते. आवळा खाऊन त्यावर पाणी प्यायला तर ते गोड लागते.
आवळा कँडी आता बरीच लोकप्रिय झाली आहे. आवळे पाच ते सात मिनिटे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवले तर ते छान उकडतात, आणि सहजपणे उकलतात. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल त्यांनी प्रेशर कुकरमध्ये ते उकडून घ्यावेत. आणखी एक पद्धत म्हणजे साधारण दीड दिवस ते फ्रीझर मध्ये ठेवले तरी ते छान उकलतात. बिया बाजूला करून ज्या कळ्या वेगळ्या होतात, त्यावर १:१ प्रमाणात साखर टाकून परातीत पसरून ठेवले तर दोन तासात त्यातून भरपूर रस सुटतो. तो रस थोडी वेलदोडा पूड घालून एका बाटलीत भरून ठेवला तर फ्रीज मध्ये टिकून राहातो. ह्यात वापरण्याच्या वेळी १:५ असे पाणी घालून त्याचे उत्तम सरबत होते. हे सरबत उत्तम पित्तनाशक आहे. सकाळी किंवा संध्याकाळी एक ग्लास हे सरबत रोज घेतले तर त्याचा पित्तप्रकृतीच्या लोकांना नक्की फायदा होतो. रस काढून घेतल्यावर थोडी पिठी साखर त्या परातीतील कळ्यांवर पेरून उन्हात दोन दिवस वाळविल्या की मस्त कँडी बनते. कोरडी झालेली कँडी बरणीत भरून ठेवली तर बरणी रिकामी कधी झाली ते समजत नाही!
उकडलेल्या आवळ्याच्या कळ्या साखर घालून सुटलेल्या रसात जर पुन्हा उकळल्या आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवल्या तर मोरावळा तयार झाला! माझी आई आणि आजी जो मोरावळा बनवीत होत्या त्यात पूर्ण आवळा असे. प्रत्येक आवळ्याला सुईने छिद्रे पाडण्याची कामे मुलांवर सोपविली जात. प्रेशर कुकर आणि मायक्रोव्हेव नसल्यामुळे मोरावळा बनविणे हे जिकिरीचे काम होते. परातीत साखरेच्या ऐवजी मीठ, हळद, तिखट आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण पसरले आणि ही मसाला कँडी बनविली तर या मसाला कँडीला अजिबात पाणी सुटत नाही. उन्हात दोन तीन दिवस वाळवून ही बरणीत भरून ठेवली तर तेलविरहित लोणचे म्हणून जेवतांना ती लज्जत वाढवेल यात शंकाच नाही. चवीप्रमाणे त्यात फोडणी थंड करून तेल टाकले तरी हरकत नाही.
कच्चा आवळा खाऊन त्यावर पाणी प्यायले की गोड चव लागते. कारण आवळ्यामध्ये सायट्रिक आम्ल म्हणजे व्हिटॅमिन सी भरपूर असते. या सायट्रिक आम्लाची चव आंबट असली तरी रासायनिक दृष्ट्या याचे रेणू साखरेसारखे असतात. त्यामुळे जिभेवर जिथे आपल्याला गोड चव लागते, तिथेच ह्यांच्या चवीविषयी संवेदना जाणवते. आवळा खाऊन पाणी प्यायलो की ते आम्ल विरल होते आणि या विरल आम्लाची गोड चव तोंडात रेंगाळते. आवळ्याच्या फळात सायट्रिक आम्लाशिवाय वेगवेगळी एलिगीटॅनिन्स असतात. त्यात एमब्लिकॅनिन ए, एमब्लिकॅनिन बी, पुनिग्लुकोनीन आणि पेडूनक्युलागीन यांचा समावेश असतो. आवळ्याची तुरट चव या विविध रसायनांमुळे असते. या शिवाय त्यात विविध प्रकारचे पॉलीफेनॉलस असतात. त्यात फ्लावोनाईड्स, इलॅगिक आम्ल, आणि गॅलिक आम्ल ह्या रसायनांचा समावेश असतो.
आयुर्वेदात आवळ्याची फळे तसेच या वृक्षाची पाने, मुळे, बिया, खोडाचे साल आणि फांद्या यांचा वापर विविध औषधे बनविण्यासाठी केला जातो. च्यवनप्राश या आयुर्वेदिक टॉनिकमधील आवळा हा प्रमुख घटकांपैकी एक महत्वाचा घटक आहे. दिवसाला एक आवळा खाल्ला तर शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन सी आपल्याला त्यातून मिळू शकते. विविध प्रकारच्या विषाणूंशी आणि जीवाणूंशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती या व्हिटॅमिन सीमुळे मिळत असते. सध्याच्या करोना विषाणूंच्या विरुद्ध लढाईतही आवळा उपयोगी पडणार आहे. आवळ्याचा मोसम आहेच, घेऊन या आवळे आणि खायला सुरुवात करा!
--