coronavirus : पुण्यात आणखी एकाला काेराेनाची लागण ; संख्या 16 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 07:58 PM2020-03-15T19:58:58+5:302020-03-15T20:01:35+5:30
पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी आणखी एका व्यक्तीला काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे : काेराेनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असून आता पुण्यातील काेराेनाग्रस्तांची संख्या 16 झाली आहे. पिंपरी चिंचवड भागातील एक व्यक्ती जपानला जाऊन आली हाेती. त्या व्यक्तीची 14 मार्चला तपासणी करण्यात आली या तपासणीत त्या व्यक्तीला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. काेराेनाचा राेज एक रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील काेराेनाच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी आता शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरु आहे. आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले हाेते. परंतु या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या इतर पाच नागरिकांना सुद्धा काेराेनाची लागण झाल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी आता प्रशासन विविध उपायांचा अवलंब करत असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच तालुक्यांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचबराेबर शहरातील महाविद्यालये, माॅल्स, मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच साेशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना घरी स्वतःला आयसाेलेट करण्यास सांगितले आहे, अशा नागरिकांच्या नातेवाईकांना साेसायटीतील इतर नागरिकांनी वाळीत टाकल्यास किंवा त्यांच्याबराेबर भेदभाव केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या नागरिकांना घरीच आयसाेलेट हाेण्यास सांगण्यात आले आहे, ते घराच्या बाहेर पडल्यास त्यांना ताब्यात घेऊन इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन करण्यात येईल असेही म्हैसेकर यांनी रविवारी आयाेजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.