coronavirus : कॅब चालकाला काेराेना झाल्याचे समाेर आले अन् आरटीओमध्ये उडाला गाेंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 07:27 PM2020-03-11T19:27:00+5:302020-03-11T19:30:31+5:30
दुबईहून भारतात आलेल्या दांपत्याला मुंबईवरुन पुण्याला घेऊन आलेल्या कॅब चालकाला काेराेनाची लागण झाल्याेच स्पष्ट झाले आहे.
पुणे : पुण्यात काेराेनाचे पाच रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. दुबईवरुन आलेल्या दांपत्याला सर्वप्रथम काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर त्यांच्या मुलीला व ज्या कॅबमधून ते मुंबईहून पुण्याला आले हाेते, त्या कॅब ड्राॅयव्हरला देखील काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
काेराेनाबाधित सर्व रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा हाेत असल्याचे देखील समाेर आले आहे. दरम्यान दांपत्य ज्या कॅबने मुंबईवरुन पुण्याला आले हाेते त्या कॅब चालकाला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते, तसेच त्याची तपासणी करण्यात आली. त्याला देखील काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. काही नागरिकांमार्फत त्या कॅब चालकाचे नाव व फाेटाे व्हाॅट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला.
काही दिवसांपूर्वी हा कॅब चालक पुणे आरटीओमध्ये एका कामानिमित्त गेला हाेता. या कॅब चालकाला काेराेनाची लागण झाल्याची माहिती मिळताच आरटीओमधील ज्या महिला कर्मचाऱ्याकडे कामानिमित्त गेला हाेता, त्या महिलेच्या मनात घबराट निर्माण झाली. त्या महिलेला कुठलाही त्रास जाणवत नव्हता. परंतु तिच्या मनात घबराट निर्माण झाल्याने त्या महिलेला तपासणीसाठी नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या महिलेचा रिपाेर्ट निगेटिव्ह आला असून खबरदारी म्हणून तीन ते चार दिवसांची सुट्टी त्या महिलेला देण्यात आली आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.