Coronavirus : सोशल मीडियावर कोरोनाविषयी अफवा पसरविणारे मेसेज पाठवू नका : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 06:44 PM2020-03-11T18:44:03+5:302020-03-11T18:49:32+5:30
कोरोना विषाणू इतर विषाणूंच्या तुलनेत झपाट्याने पसरत असल्याने योग्य ती काळजी घेणे गरजेचे
पुणे : कोरोनाविषयी अफवा, गैरसमज पसरविणारे, भीती उत्पन्न करणारे संदेश सोशल मीडियावर पाठवू नयेत. काही लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरु आहेत. नागरिकांनी त्यांच्या प्रयत्नांना बाधा येईल अशाप्रकारची कोणतीही कृती नरु नयेत. तसेच सर्व नागरिकांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोरोना संसर्गजन्य असल्याने खोकताना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा, हात वारंवार धुवावा, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.
चीनसह जगातील विविघ देशात थैमान घालणाऱ्या 'कोरोना' विषाणू भारतात धडकला असून त्याचे काही संशयित पुण्यासह कर्नाटक , केरळ, मध्ये सापडले आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या एका दांपत्यासह त्यांच्या मुलीला व एका ओला चालकाला या कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वरे कोरोनाविषयी काळजी घेण्याचे आवाहन केले. गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असेही बापट यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. .
बापट म्हणाले, पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्याकडून वेळोवेळी तयारीचा आढावा घेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोना विषाणू इतर विषाणूंच्या तुलनेत झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी याबाबत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. हा आजार योग्य दक्षतेने व वेळीच उपचार केल्यामुळे बरा होवू शकतो. जगभरात या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सांगितलेल्या उपाय योजनांचा अवलंब केला पाहिजे.
बाधित रुग्णांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय महापालिकेकडून आणखी दोन विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहेत.