पुणे : काेराेनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने पुणे जिल्हा प्रशासनाकडून आता अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. आत्तापर्यंत पुणे शहरात 10 नागरिकांना काेराेनाची लागण झाली आहे. तर जिल्ह्यामध्ये एकूण 15 लाेक कराेनाबाधित असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे काेरेानाचा प्रसार वाढू नये यासाठी पुण्यातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू करण्याचा विचार असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
काेराेनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते, यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम उपस्थित हाेते. म्हैसेकर म्हणाले, नव्याने ज्या पाच नागरिकांना काेराेनाची लागण झाली आहे ते लाेक कुठल्याही बाहेरील देशात प्रवास करुन आले नव्हते. त्यांना बाहेरील देशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच काराेनाचा प्रसार हा विदेशात न गेलेल्या नागरिकांना झाल्याचे समाेर आले आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील काही ठिकाणी कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालये जरी बंद असले तरी कुठलेही महाविद्यालय विद्यार्थ्यांना वसतीगृह खाली करण्यास सांगू शकत नाही. परंतु विद्यार्थ्यांनी वसतीगृह किंवा माहविद्यालयाच्या बाहेर फिरु नये असे आवाहन म्हैसेकर यांनी केले. तसेच माॅल जरी बंद असले तरी माॅलमधील किराणा दुकाने आणि मेडिकलची दुकाने सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांना घरी राहण्यास सांगण्यात आले आहे त्या नागरिकांना इतर साेसायटीतील नागरिकांनी त्रास देऊ नये असे आवाहन सुद्धा म्हैसेकर यांनी केले, तसेच ज्या नागरिकांना घरी राहण्यास सांगण्यात आले आहे त्यांनी घराबाहेर पडू नये अन्यथा त्यांना ताब्यात घेऊन आयसाेलेशन वाॅर्डमध्ये ठेवावे लागेल असेही म्हैसेकर यांनी सांगितले.